रोटरी क्लब बल्लारपूरचा १५ वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न : समाजोपयोगी उपक्रमांचा निर्धार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : रोटरी क्लब बल्लारपूरच्या वर्ष २०२६-२०२७ या कार्यकाळासाठीचा १५ वा पदग्रहण सोहळा शनिवारी १८ जुलै रोजी विद्याश्री कॉन्व्हेंट, बल्लारपूर येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. नवनियुक्त अध्यक्ष म्हणून रोटेरियन राजू मुंधडा, तर सचिव म्हणून रोटेरियन निखिल गुजरकर यांनी पदभार स्वीकारत आगामी काळात विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटेरियन राजू मुंधडा होते. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी तथा रोटेरियन अर्जुन पावरा, उपप्रांतपाल अनुप यादव, वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ दिनेश खाटे, मावळते अध्यक्ष निलेश चिमड्यालवार तसेच नवनियुक्त सचिव निखिल गुजरकर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.
मावळते अध्यक्ष निलेश चिमड्यालवार यांनी आपल्या कार्यकाळात राबविण्यात आलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचा आढावा घेतला. त्यानंतर नूतन अध्यक्ष राजू मुंधडा यांनी मावळते अध्यक्ष निलेश चिमड्यालवार यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच नूतन सचिव निखिल गुजरकर यांनी मावळते सचिव राजू मुंधडा यांच्याकडून कार्यभार स्वीकारला.
यावेळी रोटरॅक्ट क्लब बल्लारपूरच्याही नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा पार पडला. नूतन अध्यक्ष देव मेश्राम आणि नूतन सचिव अमोल वर्मा यांनी पदभार स्वीकारून नवीन कार्यकाळाची जबाबदारी स्वीकारली.
समाजसेवेच्या परंपरेला पुढे नेत रोटरी क्लब बल्लारपूरतर्फे यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळा आणि साईबाबा प्राथमिक शाळा (नगर परिषद, बल्लारपूर) यांना वॉटर प्युरिफायर मशीनचे वितरण करण्यात आले. तसेच अमित कुमार यांचे नवीन सदस्य म्हणून रोटरी पिन प्रदान करून स्वागत करण्यात आले.
उपप्रांतपाल अनुप यादव यांनी रोटरी क्लब बल्लारपूरच्या समाजोपयोगी कार्याचे कौतुक करत भविष्यातही सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. वन्यजीव संवर्धन तज्ज्ञ दिनेश खाटे यांनी वन्यजीव संरक्षणामध्ये सामाजिक संस्थांची भूमिका स्पष्ट केली. प्रमुख अतिथी अर्जुन पावरा यांनीही रोटरीच्या कार्याचे कौतुक करून प्रशासनाच्या वतीने आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी वर्ष २०२६-२०२७ साठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची निवड करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात राजू मुंधडा यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.
या सोहळ्यास रोटेरियन मनीष मूलचंदानी, कल्पेश पटेल, प्रफुल चरपे, उमेश पटेल, राहुल वरू, अनुप गंगशेट्टीवार, विक्रांत पंडित, हेमराज गेडाम, शैलेश झाडे, अजय वासलवार, गोपाल ठाकूर, रमेश पटेल, अखिल निखारे, सचिन तल्हार, अमित कुमार, उत्तम पटेल, सुरेश कुकरेजा, डॉ. प्रशिक वाघमारे यांच्यासह रोटरॅक्ट क्लबचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटेरियन प्रशांत दोंतुलवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन रोटरॅक्टर अमोल वर्मा यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
News - Chandrapur




Petrol Price




