महत्वाच्या बातम्या

 हेडलाइट बंद पडल्याने ई-रिक्षा पलटली : अपघातात पत्नीचा मृत्यू, चालक पतीविरुद्ध गुन्हा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : कन्हान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तारसा रोडवरील निलज शिवारात मालवाहू ई-रिक्षाचा हेडलाइट अचानक बंद पडल्याने झालेल्या अपघातात चालकाच्या पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवून पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत कन्हान पोलिसांनी चालक पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकित भारत पाटील रा. सालवा-येसंबा, ता. मौदा हे शुक्रवारी रात्री पत्नी शीतल अंकित पाटील यांच्यासह मालवाहू तीनचाकी ई-रिक्षाने कन्हान येथून सालवा येसंबाकडे निघाले होते. रात्री सुमारे साडेदहा ते पावणेअकराच्या दरम्यान तारसा रोडवरील सरपंच हॉटेलजवळ ई-रिक्षाचा हेडलाइट अचानक बंद पडला.

चालत्या वाहनातच हेडलाइट सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ई-रिक्षा रस्त्याच्या डाव्या बाजूला उतरून पलटली. या अपघातात शीतल पाटील या वाहनाखाली दबल्या गेल्याने त्यांच्या डोक्याला आणि उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली. चालक अंकित पाटील यांनाही डोके, पाय व कमरेला मार लागला.

घटनेनंतर जखमींना तातडीने कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शीतल पाटील यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत पाटणकर यांच्या फिर्यादीवरून चालक अंकित भारत पाटील याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितान बीएनएस कलम २८१ आणि १०६ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास कन्हान पोलीस करीत असून, अपघातास कारणीभूत ठरलेल्या सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos