पावसाने फिरवली पाठ : धानाची परे करपण्याच्या मार्गावर


- वडसा तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात महिनाभरापासून पावसाची दडी; वीजेअभावी सिंचनही ठप्प, खरीप हंगामावर संकटाचे सावट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / वडसा : खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच वडसा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. मृग नक्षत्राच्या प्रारंभी झालेल्या अल्प पावसाच्या आधारावर मोठ्या आशेने टाकलेली धानाची परे (नर्सरी) आता पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर आली आहेत. महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने रोवणीचे नियोजन विस्कळीत झाले असून, खरीप हंगाम धोक्यात आल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असून येथील बहुतांश शेती पूर्णपणे पावसावर अवलंबून आहे. यंदा हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या हलक्या पावसामुळे शेतकऱ्यांनी धानाची परे टाकून रोवणीची तयारी केली होती. सध्या या परब्यांना जवळपास महिनाभराचा कालावधी पूर्ण होत असताना पावसाचा थेंबही न पडल्याने अनेक गावांमध्ये परे कोमेजून वाळू लागल्या आहेत. त्यामुळे परे वाचवण्यासाठी शेतकरी दिवसरात्र शेतात धावपळ करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
वीज पुरवठ्याच्या बोजवार्याने वाढले संकट -
पावसाअभावी अनेक शेतकरी विहिरी आणि बोअरवेलच्या साहाय्याने परे जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, महावितरणच्या अनियमित वीज पुरवठ्यामुळे हा पर्यायही निष्प्रभ ठरत आहे. ग्रामीण भागात सततचे लोडशेडिंग, कमी दाबाने मिळणारी वीज आणि वारंवार खंडित होणारा पुरवठा यामुळे बोअरवेलच्या मोटारी सुरू होत नसल्याने पाणी उपसणे अशक्य झाले आहे.
विहिरी आणि बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध असूनही वीज वेळेवर व पुरेशा दाबाने मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना धानाची परे उघड्या डोळ्यांनी करपत असल्याचे पाहावे लागत आहे. खरीप हंगामाच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
रखडलेल्या चुकार्यांमुळे आर्थिक अडचण -
नैसर्गिक संकटासोबतच आर्थिक अडचणींनीही शेतकऱ्यांची कोंडी केली आहे. मागील रब्बी हंगामात शासकीय खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या धानाचे चुकारे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात अद्याप जमा झालेले नाहीत. महिना उलटूनही पैसे न मिळाल्याने खरीप हंगामासाठी लागणारी खते, बियाणे, औषधे आणि मशागतीचा खर्च भागविण्यासाठी अनेकांना उसनवारी करावी लागत आहे.
याशिवाय, यंदाचा धान बोनसही अद्याप मिळालेला नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. एका बाजूला पावसाची दडी, दुसऱ्या बाजूला वीजेचा तुटवडा आणि तिसऱ्या बाजूला रखडलेली शासकीय देयके अशा तिहेरी संकटामुळे बळीराजा आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे.
तातडीने उपाययोजनांची मागणी -
पावसाने आणखी काही दिवस ओढ दिली आणि वीज पुरवठ्याची समस्या कायम राहिली, तर यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे हातातून जाण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने जिल्हाभरातील परिस्थितीचे सर्वेक्षण करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, महावितरणने शेतीसाठी अखंड व पुरेशा दाबाने वीज पुरवठा सुनिश्चित करावा, तसेच रब्बी हंगामातील रखडलेले धानाचे चुकारे आणि बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करून त्यांना आर्थिक दिलासा द्यावा, अशी मागणी वडसा तालुक्यासह संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील शेतकरी वर्गातून होत आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




