महत्वाच्या बातम्या

 एमआयडीसी परिसरातून गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक चोरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत एचपी गॅस सिलेंडरने भरलेला ट्रक अज्ञात चोरट्यांनी पळवून नेल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत ट्रकसह गॅस सिलेंडर असा एकूण २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, वैभव विनोद खांडरे (वय ४२), रा. समाधी वॉर्ड, जेल रोड, चंद्रपूर हे गेल्या चार वर्षांपासून एलपीजी गॅस सिलेंडर वाहतुकीचा व्यवसाय करीत असून, त्यांच्या मालकीचे १२ ट्रक आहेत. ते वरोरा येथील श्री स्वामी समर्थ ट्रान्सपोर्टिंग कंपनीमार्फत एचपी गॅस सिलेंडरची वाहतूक करतात.

१२ जुलै २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता एमएच ३४ बीजी १६०० क्रमांकाचा अशोक लेलँड कंपनीचा ट्रक एमआयडीसी खुटाळा येथील एचपी गॅस बॉटलिंग प्रकल्पातून गॅस भरून कंपनीसमोरील रस्त्यावर उभा करण्यात आला होता. त्यानंतर रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास चालक राज नागम्मवार यांनी ट्रक पार्किंगच्या ठिकाणी नसल्याची माहिती वैभव खांडरे यांना दूरध्वनीवरून दिली.

माहिती मिळताच खांडरे यांनी तत्काळ परिसरात ट्रकचा शोध घेतला. मात्र, ट्रक व त्यातील माल कुठेही आढळून आला नाही. चोरी झालेल्या ट्रकमध्ये ३३२ घरगुती (१४.२ किलो) एचपी गॅसने भरलेले सिलेंडर, अंदाजे १० लाख ५९ हजार रुपये, तसेच १० व्यावसायिक (१९ किलो) गॅसने भरलेले सिलेंडर, अंदाजे ५५ हजार रुपये किमतीचे होते. याशिवाय अशोक लेलँड कंपनीचा ट्रक, अंदाजे १० लाख रुपये किमतीचा असल्याने एकूण २१ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी लंपास केला.

या प्रकरणी वैभव खांडरे यांच्या तक्रारीवरून पडोली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पडोली पोलीस करीत आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos