महत्वाच्या बातम्या

 शेतात काम करताना ५० वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : सालेकसा तालुक्यातील बंजारी शेतशिवारात काम करीत असताना एका ५० वर्षीय शेतकऱ्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना ११ जुलै रोजी घडली. कामादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, सालेकसा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेश बुधराम उईके ३० वर्षे, रा. बंजारी, ता. सालेकसा यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांचे वडील बुधराम कुसराम उईके ५० वर्षे हे ११ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ७ वाजताच्या दरम्यान बंजारी येथील शेतात काम करीत होते. काम सुरू असतानाच त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने ते शेतातील झोपडीत जाऊन आराम करू लागले.

सायंकाळी जेवणासाठी त्यांना उठविण्यास गेल्यानंतर त्यांच्या तोंडातून फेस येत असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना तातडीने दरेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी सालेकसा ग्रामीण रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, सालेकसा ग्रामीण रुग्णालयात पोहोचल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच सालेकसा पोलिसांनी रुग्णालयात धाव घेत पंचनामा करून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असून, पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.





  Print






News - Gondia




Related Photos