गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई : अवैध दारूसह चारचाकी वाहन जप्त, ८.२४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात लागू असलेल्या दारूबंदी कायद्याला हरताळ फासत अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध गडचिरोली पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अवैध दारूसह वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली चारचाकी गाडी जप्त करण्यात आली असून आरोपी जंगलाचा फायदा घेत पसार झाला आहे. त्याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक एम. रमेश यांनी जिल्ह्यातील अवैध दारू विक्री व वाहतुकीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ११ जुलै रोजी चामोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई केली.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा -
सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे यांना गोपनीय माहिती मिळाली होती की, महिंद्रा एक्सयूव्ही (क्रमांक एमएच-४९ एई-५९२५) या लाल रंगाच्या वाहनातून मोठ्या प्रमाणात अवैध देशी-विदेशी दारूची वाहतूक केली जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुनघाडा फाटा येथे सापळा रचला.
दरम्यान, संशयित वाहन घटनास्थळी येताच पोलिसांनी ते अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालक राजेंद्र सपन मंडल (वय २७, रा. कुनघाडा, ता. चामोर्शी) याने यू-टर्न घेत पळ काढण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान त्याने रस्त्यावरील एका अन्य चारचाकी वाहनाला धडक दिली आणि वेगाने फरार झाला.
जंगलात वाहन सोडून आरोपी पसार -
पोलिसांचे वाहन अडकल्यामुळे त्यांनी तत्काळ एका खासगी वाहनाच्या मदतीने आरोपीचा पाठलाग सुरू ठेवला. वाहनाच्या टायरच्या खुणा आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शोधमोहीम राबविण्यात आली. अखेर आरोपीने पोटेगावकडे जाणाऱ्या नवरगाव जंगल परिसरात वाहन सोडून जंगलाचा फायदा घेत पलायन केल्याचे आढळून आले.
८.२४ लाखांचा मुद्देमाल जप्त -
पंचांसमक्ष वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी मद्याचा साठा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये –
- ३५ बॉक्समध्ये ३,५०० प्लास्टिक सीलबंद बाटल्या (रॉकेट संत्रा देशी दारू) – किंमत २,८०,००० रुपये
- हॅवर्ड्स ५००० कंपनीचे २४ बिअर कॅन – किंमत ७,२०० रुपये
- रॉयल स्टॅग विदेशी दारूच्या ४८ बाटल्या – किंमत १६,८०० रुपये
- रॉयल स्टॅगच्या १०० निपा – किंमत २०,००० रुपये
- दारू वाहतुकीसाठी वापरलेली महिंद्रा एक्सयूव्ही – अंदाजे किंमत ५ लाख रुपये, असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू -
या प्रकरणी चामोर्शी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३५७/२०२६ नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता कलम २८१, महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम ६५(अ), ९८ तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपी राजेंद्र सपन मंडल याचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शाहू दंडे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई -
ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक (अभियान) कार्तिक मधीरा, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) गोकुल राज जी. यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस अधीक्षक अनिकेत हिरडे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. जिल्ह्यात अवैध दारूविरोधातील कारवाया पुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




