ब्रिक्स ट्रान्सपोर्ट वर्किंग ग्रुप बैठकीसाठी नागपूर सज्ज : ११ देशांचे प्रतिनिधी होणार सहभागी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर येथे ९ ते १२ जुलैदरम्यान तिसऱ्या ब्रिक्स ट्रान्सपोर्ट वर्किंग ग्रुप बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, या महत्त्वपूर्ण आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी जिल्हा प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली आहे. परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांसह एकूण ११ देशांतील प्रतिनिधी सहभागी होणार असून, प्रत्येक देशातून एक मंत्री आणि तीन वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
परिषदेच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीला उपवनसंरक्षक डॉ. विनिता व्यास, पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के, निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिषदेच्या आयोजनासाठी केंद्र व राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि अन्य यंत्रणांच्या समन्वयातून तयारी करण्यात आली आहे. परदेशी प्रतिनिधींसाठी निवास, वाहतूक, सुरक्षा, वैद्यकीय सुविधा, दुभाषे, परिषदस्थळावरील तांत्रिक व्यवस्था आणि प्रोटोकॉलची विशेष व्यवस्था करण्यात येत आहे.
देशाच्या मध्यवर्ती भागात असलेले नागपूर राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे आणि हवाई संपर्काच्या दृष्टीने महत्त्वाचे शहर मानले जाते. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी नागपूरची निवड करण्यात आली आहे. या परिषदेमुळे शहराची जागतिक स्तरावरील ओळख अधिक दृढ होण्यास मदत होणार असून, वाहतूक आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय सहकार्याला चालना मिळण्याबरोबरच नागपूरच्या लॉजिस्टिक हब म्हणून असलेल्या क्षमतेलाही अधोरेखित केले जाणार आहे.
News - Nagpur




Petrol Price




