बल्लारपूरात पोलिसांची धडक कारवाई : ३० पेट्या अवैध देशी दारूसह ७.२० लाखांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलिसांनी अवैध मद्यविक्रीविरोधात मोठी कारवाई करत ३० जून रोजी रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास साईबाबा वॉर्ड परिसरातून ३० पेट्या अवैध देशी दारू व चारचाकी वाहनासह ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून दारूचा पुरवठा करणारा मुख्य आरोपी फरार आहे.
बल्लारपूर पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथक शहरात गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे साईबाबा येथील एका घरासमोर उभ्या असलेल्या एमएच-३४-बीआर-२९९४ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या वाहन मधून अवैधरित्या देशी दारूचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली. वाहनाची झडती घेतली असता रॉकेट संत्रा कंपनीच्या ९० मिली क्षमतेच्या ३० पेट्यांमध्ये एकूण ३ हजार सिलबंद देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत आरोपी सारंग शैलेश राहुलगडे (वय २६), रा. साईबाबा वॉर्ड, बल्लारपूर याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान हा दारूसाठा आरोपी विकास रा. बाबूपेठ, चंद्रपूर याच्याकडून आणल्याची माहिती समोर आली. त्यानुसार आरोपी विकास याला या गुन्ह्यात पाहिजे आरोपी करण्यात आले असून त्याचा शोध सुरू आहे.
कारवाईदरम्यान ६ लाख रुपये किमतीची वाहन आणि १ लाख २० हजार रुपये किमतीच्या ३० पेट्या अवैध देशी दारू असा एकूण ७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी बल्लारपूर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५(अ) व ८३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून अवैध मद्य पुरवठ्याच्या साखळीचा तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांचा नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा पंकज शिंदे, सत्यवान कोटनाके, विकास जुमनाके, पुरुषोत्तम चिकाटे, नापोअं सचिन अल्लेवार, लखन चव्हाण, खंडेराव माने, वैभव गाडगे, महेश कुकुडकर, मपोअं अनिता नायडू यांनी केले.
News - Chandrapur




Petrol Price




