सहकार क्षेत्र हादरले : साई नागरी पतसंस्थेतील कोट्यवधींचा अपहार, रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : श्री साई नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, चंद्रपूर येथील आर्थिक गैरव्यवहार आणि अपहारप्रकरणी अखेर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. लेखापरीक्षणात तब्बल २ कोटी ४९ लाख ८ हजार ९४९ रुपये ५० पैशांच्या अफरातफर व अपहाराचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्या आदेशानुसार संस्थेच्या सन २०२३ ते २०२५ या कालावधीचे वैधानिक लेखापरीक्षण करण्यात आले होते. लेखापरीक्षक श्रेणी-२ संदीप जयदेव भानसे यांनी सादर केलेल्या लेखापरीक्षण व विनिर्दिष्ट अहवालात संस्थेतील अनेक आर्थिक अनियमितता, बनावट व्यवहार, ठेवींची परतफेड, खोट्या नोंदी तसेच कर्जवसुली आणि रोख व्यवहारांमधील गंभीर त्रुटी निदर्शनास आल्या.
अहवालानुसार काही सभासदांना मुदतठेवींची दुहेरी परतफेड करण्यात आल्याचे, रोख शिल्लकीत तफावत असल्याचे, जमा पावत्या व केशबुकमधील नोंदींमध्ये विसंगती असल्याचे, बनावट व खोट्या व्यवहारांद्वारे निधी वळविण्यात आल्याचे तसेच खर्च व जमा व्हाउचर्समध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळल्याचे नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय थकीत कर्ज प्रकरणात ५५.४० लाख रुपयांची रक्कम तर सभासद ठेवी देणी प्रकरणात १.७० कोटी रुपयांहून अधिक रकमेची अनियमितता आढळल्याचे लेखापरीक्षणात स्पष्ट झाले आहे. या सर्व बाबींचा एकत्रित विचार करता संस्था आणि सभासदांची आर्थिक फसवणूक झाल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ सदस्य, व्यवस्थापक तसेच अभिकर्ता यांच्यासह एकूण अनेक जबाबदार व्यक्तींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपींमध्ये सुरेश बाबूराव धानोरकर, मनश्री गिरीश अंबाडे, दिलीप सिताराम कडू, सागर श्रीकांत भट्टलवार, प्रकाश गोपाळकृष्ण देशकर, पुरुषोत्तम जगन्नाथ वडे, दत्तात्रय जनार्दनपंत घरोटे, नामदेव मारोतराव निकोडे, वासुदेव रामजी सावसाकडे, वासुदेव जादळू बांगडवार, प्रकाश बनकर, संदीप महाजन, विक्रम ब्राम्हणे, सीमा सुरेश धानोरकर तसेच संबंधित कालावधीतील इतर पदाधिकारी व संचालक मंडळ सदस्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस अधीक्षक कार्यालय, चंद्रपूर यांच्या आदेशान्वये रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके करीत आहेत. सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील आर्थिक गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असल्याने तपासात आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
News - Chandrapur




Petrol Price




