महत्वाच्या बातम्या

 बल्लारपूरात दुहेरी घरफोडी : व्यावसायिकाच्या घरातून २३.७४ लाखांचा ऐवज लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर शहरातील शिवाजीनगर परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका व्यावसायिकाच्या घरात धाडसी घरफोडी करून तब्बल २३ लाख ७४ हजार १०० रुपयांचा मौल्यवान ऐवज चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे चोरट्यांनी दोन दिवसांच्या अंतराने दोन वेळा घरात प्रवेश करून चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजवीरसिंह धनसिंह सनवाल हे शिवाजीनगर, बल्लारपूर येथे वास्तव्यास असून त्यांचा व्यवसाय आहे. त्यांच्या घराचे नूतनीकरण सुरू असल्याने ते नागपूर येथे मुलाकडे गेले होते. दरम्यान, २४ जूनच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून व दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. याबाबत माहिती मिळताच त्यांनी बल्लारपूर गाठून घराची पाहणी केली. घरातील साहित्याची मोजदाद सुरू असतानाच २७ जूनच्या मध्यरात्री चोरट्यांनी पुन्हा घरात प्रवेश करून आणखी साहित्य चोरी केल्याचे उघड झाले.

चोरीस गेलेल्या ऐवजात विविध कंपन्यांचे हेल्थ फॉसेट, सिंक फॉसेट, तांब्याची वायर, तांब्याच्या प्लेट, रॉड व पट्ट्या, वेल्डिंग मशीन, ग्राइंडर, संगणक, यूपीएस, एअर गन, लाईटनिंग अरेस्टर, इंडक्शन, गॅस हॉब, पिस्तूल तसेच इतर बांधकाम साहित्याचा समावेश आहे.

याशिवाय चोरट्यांनी घरातील मौल्यवान दागिन्यांवरही हात साफ केला. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये १५ ग्रॅम सोन्याची पन्ना जडित अंगठी, ६० ग्रॅम सोने असलेली मुंगा, रुद्राक्ष व स्फटिकांची विशेष माळ, १५ ग्रॅम सोने असलेला मोत्याचा नेकलेस तसेच कानातील टॉप्स यांचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये किमान ९० ग्रॅम सोन्याचा समावेश असून घरातील मंदिरातील चांदीची भांडीही चोरट्यांनी लंपास केली आहेत. या घरफोडीत एकूण २३ लाख ७४ हजार १०० रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. 

राजवीर सिंह धनसिंह सनवाल यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अज्ञात आरोपींविरुद्ध घरफोडी व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत.





  Print






News - Chandrapur




Related Photos