महत्वाच्या बातम्या

 गडचिरोलीत जलयोगाने साजरा झाला आंतरराष्ट्रीय योगदिन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : शरीर व मनाच्या सृदृढतेसाठी आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त रविवार (ता. २१) सर्वत्र योग-प्राणायामाचे कार्यक्रम होत असताना येथील शासकीय जलतरण तलावात जलयोग करून हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

स्थानिक काॅम्प्लेक्स परीसरातील जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय परीसरातील शासकीय जलतरण तलावात जिल्हा क्रीडाधिकारी भास्कर घटाळे यांच्या मार्गदर्शनात जलयोग उपक्रम आयोजित करण्यात आला होता. पत्रकार संघाचे अध्यक्ष, वनविभागाचे मानद वन्यजीव रक्षक तथा योग अभ्यासक मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष व योग अभ्यासक प्रशांत वाघरे तसेच मत्ते, इंगळे, प्रज्वल मेश्राम, यश उंदीरवाडे यांच्यासह इतर योगप्रेमींनी जलतरण तलावाच्या पाण्यात विविध प्रकारची आसने केली.

यात वृक्षासन, ताडासन, मंडूकासन, पद्मासन, शवासन, धनुरासन अशी विविध प्रकारची आसने तसेच प्राणायामही करण्यात आले. या उपक्रमासाठी बाळू रामटेके, रामदास जराते तसेच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आदींनी सहकार्य केले. जलयोग म्हणजे पाण्यात केली जाणारी योगासने व प्राणायाम होय. पाण्याच्या आधारामुळे शरीर हलके होते आणि योग करणे सोपे जाते.जलयोगामुळे सांधे व स्नायूंचा उत्तम वापर होऊन आरोग्य सुधारते. 

गुडघेदुखी, कंबरदुखी, संधिवात असणाऱ्यांना जलयोग अधिक लाभदायक आहे. व्यायाम पाण्यात होत असल्याने गुरूत्वाकर्षण शक्ती कमी होऊन स्नायू दुखावण्याची भीती नसते. पाण्याचा दाब छातीवर आल्याने श्वासोच्छ्वास खोल होऊन फुफ्फुसांची क्षमता वाढते व रक्ताभिसरण सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो,  विशेष म्हणजे पाण्यात हालचाल करायला जास्त ऊर्जा लागते. त्यामुळे वजन व लठ्ठपणा कमी करण्यासाठीही जलयोग उपयोग्त आहे. जलयोगामुळे पोट, कंबरेची चरबी कमी होते. पाणी मन शांत करते, त्यामुळे ताण-तणाव कमी होतो. तसेच निद्रानाश, चिंता दूर होण्यास मदत होते. पाण्यात ध्यानसुद्धा लवकर लागते. लहान मुले, गरोदर महिला, वृद्ध व्यक्ती सगळे जलयोग सहज करून शकतात. जलयोगामुळे शरीर सृदृढ व लवचिक होते, अशी माहिती योग अभ्यासक मिलिंद उमरे यांनी दिली.





  Print






News - Gadchiroli




Related Photos