महत्वाच्या बातम्या

 राज्यात मान्सूनपुर्व रोगप्रतिबंधक लसीकरणाला मोहिम स्वरुपात प्रारंभ


- लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या पुर्तीसाठी पशुसंवर्धन विभागाचे काटेकोर नियोजन

 विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुधनाला विविध संसर्गजन्य आजारांपासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने कंबर कसली आहे. राज्यात मान्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहीम आता युद्धपातळीवर व मोहीम स्वरूपात सुरू करण्यात आली आहे. राज्यातील पशुधनाचे आरोग्य राखणे व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळणे हे आपले मुख्य ध्येय असून, निश्चित केलेल्या लक्ष्यांकित उद्दिष्टांच्या शंभर टक्के पूर्तीसाठी विभागाने काटेकोर नियोजन केले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली. या मोहिमेत सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

पावसाळ्यापूर्वी होणाऱ्या घटसर्प व फऱ्या यांसारख्या घातक आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीची गुणवत्ता टिकून राहणे अत्यंत महत्त्वाचे असते. लसीचा प्रभाव उत्तम राहण्यासाठी शीतसाखळी व्यवस्थापन अत्यंत चोख ठेवण्यात आले आहे. राज्यस्तरापासून ते थेट ग्रामीण भागातील उपकेंद्रांपर्यंत लस पोहोचवताना आवश्यक तापमान राखले जाईल, यासाठी अद्ययावत कोल्ड बॉक्सचा वापर केला जात आहे, असे पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सांगितले.

मोहीम यशस्वी करण्यासाठी विभागामार्फत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत जिल्हा व तालुका पातळीवर आवश्यकतेनुसार लसींचा पुरेसा साठा आधीच वितरित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची पथके तयार करण्यात आली असून, ती प्रत्यक्ष गावागावांत व गोठ्यांपर्यंत पोहोचून डोअर स्टेप पद्धतीने लस टोचणी करत आहेत. एकाही जनावराचे लसीकरण सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

पशुपालकांना आवाहन -
पावसाळ्यात जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते व संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो. त्यामुळे ऐनवेळी येणारे संकट आणि होणारे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी पशुपालकांनी आपल्या गाई, म्हशी, शेळ्या व मेंढ्यांचे मान्सूनपूर्व लसीकरण करून घ्यावे. यासाठी आपल्या जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधून या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.

भारत पशुधन प्रणालीवर  तत्काळ नोंदणी -
यावेळच्या मोहिमेचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लसीकरणाचे पारदर्शक डिजिटल ट्रॅकिंग होय. प्रत्येक पशुधनाला लस टोचल्यानंतर त्याची नोंद भारत पशुधन प्रणाली या केंद्र सरकारच्या अधिकृत पोर्टलवर रिअल-टाइम (तात्काळ) करणे आवश्यक आहे. पशुधनाचे टॅगिंग (१२ अंकी बिल्ला) करूनच ही नोंदणी केली जावी, जेणेकरून मोहिमेच्या प्रगतीवर थेट देखरेख ठेवता येईल व बोगस नोंदींना आळा बसेल.





  Print






News - Nagpur




Related Photos