महत्वाच्या बातम्या

 मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी : अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षणासाठी अर्ज सुरू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : विद्यार्थ्यांमधील वाढता शैक्षणिक ताण, भावनिक समस्या, वर्तनात्मक अडचणी, सोशल मीडिया आणि डिजिटल व्यसन, करिअरविषयक संभ्रम तसेच मानसिक आरोग्याशी संबंधित वाढत्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) मार्फत अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमासाठी १५ ते २२ जून २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत.

मानसशास्त्र, समुपदेशन आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील पदवीधर व पदव्युत्तर युवक-युवतींना मानसिक आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक संधी उपलब्ध करून देणे, तसेच शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रशिक्षित समुपदेशकांची फळी तयार करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. विशेष म्हणजे, पात्र उमेदवारांसाठी हे प्रशिक्षण पूर्णतः मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था (MIMH) ही तांत्रिक भागीदार म्हणून कार्यरत राहणार आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि क्षमता विकासाचा व्यापक अनुभव असलेल्या या संस्थेमार्फत अभ्यासक्रमाची आखणी, प्रशिक्षण प्रक्रिया, पर्यवेक्षण (सुपरव्हिजन) आणि गुणवत्ता नियंत्रणाची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.

विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर विशेष लक्ष -
अमृत मानसमित्र कार्यक्रमांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य, भावनिक स्वास्थ्य आणि जीवनकौशल्य विकासासाठी प्रशिक्षित समुपदेशक तयार करण्यात येणार आहेत. प्रशिक्षणामध्ये विद्यार्थी समुपदेशनाची मूलतत्त्वे, बाल व किशोर मानसिक आरोग्य, संवाद कौशल्ये, सक्रिय श्रवण, तणाव व्यवस्थापन, जीवनकौशल्य शिक्षण, आत्महत्या प्रतिबंध, संकट व्यवस्थापन, सायबर सुरक्षा, डिजिटल आरोग्य, पालक-शिक्षक समन्वय, मानसिक आरोग्य जनजागृती उपक्रमांचे आयोजन तसेच शाळा आधारित समुपदेशन व रेफरल प्रणाली यांचा समावेश असणार आहे.

कौशल्य विकासावर भर -
या प्रशिक्षणात सैद्धांतिक ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष समुपदेशन कौशल्ये विकसित करण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे. यामध्ये केस स्टडी, रोल प्ले, तज्ज्ञांचे मार्गदर्शन, पर्यवेक्षण आणि क्षेत्रीय अनुभवाचा समावेश असेल. प्रशिक्षणाचे स्वरूप हायब्रीड (ऑनलाइन आणि ऑफलाइन) ठेवण्यात आले असून १५ दिवसांचे प्रत्यक्ष वर्ग प्रशिक्षण, एक महिन्याची निरीक्षणाधारित क्षेत्रीय नियुक्ती, ऑनलाइन तज्ज्ञ सत्रे, केस चर्चा आणि सहा महिन्यांचे मार्गदर्शन व सुपरव्हिजन यांचा समावेश राहणार आहे.

प्रशिक्षणानंतर रोजगाराच्या विविध संधी -
प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना शाळा व महाविद्यालयीन समुपदेशक, मानसमित्र समुपदेशक, जीवनकौशल्य प्रशिक्षक, मानसिक आरोग्य जनजागृती प्रशिक्षक, पालक व शिक्षक कार्यशाळा समन्वयक तसेच विद्यार्थी कल्याण अधिकारी म्हणून काम करण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. याशिवाय स्वतंत्र समुपदेशन सेवा सुरू करून स्वयंरोजगाराचा मार्गही खुला होणार आहे.

पात्रता व निवड प्रक्रिया -
एम.ए./एम.एस्सी. मानसशास्त्र, एम.ए./एम.एस्सी. समुपदेशन मानसशास्त्र किंवा मास्टर ऑफ सोशल वर्क (एमएसडब्ल्यू) ही शैक्षणिक पात्रता असलेले तसेच अमृतच्या लक्षित गटातील उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात. अर्जासोबत अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र आणि अन्य आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतील.

प्रत्येक बॅचमध्ये साधारणतः २० ते ३० उमेदवारांची निवड करण्यात येणार असून जिल्हानिहाय गरज, विद्यार्थी संख्या आणि उपलब्ध संसाधनांचा विचार करून प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पुण्यात होणार ऑफलाइन प्रशिक्षण -
सहा महिन्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमातील १५ दिवसांचे ऑफलाइन प्रशिक्षण पुणे येथील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेत होणार आहे. या कालावधीत निवास व भोजनाची व्यवस्था प्रशिक्षणार्थींनी स्वतः करावयाची आहे. मात्र, पात्र उमेदवारांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च अमृत संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याने हे प्रशिक्षण विनामूल्य उपलब्ध होणार आहे.

प्रमाणपत्रामुळे करिअरला चालना -
प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना अमृत मानसमित्र समुपदेशक हे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. या प्रमाणपत्राच्या आधारे शैक्षणिक संस्था, मानसिक आरोग्यविषयक उपक्रम आणि जीवनकौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये काम करण्यासाठी उमेदवारांना प्राधान्य मिळू शकते.

१५ ते २२ जूनदरम्यान ऑनलाइन अर्ज -
अमृत मानसमित्र समुपदेशक प्रशिक्षण कार्यक्रमाच्या पहिल्या बॅचसाठी १५ जून ते २२ जून २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी अमृतच्या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र उमेदवारांना ई-मेल किंवा संदेशाद्वारे कळविण्यात येणार आहे. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश दिला जाणार असून, निर्धारित मुदतीत प्रवेश न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे.

या योजनेबाबत अधिक माहितीसाठी इच्छुकांनी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक, गांधी चौक येथील कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos