महत्वाच्या बातम्या

 बीआयटी कॉलेजसमोरील शेतशिवारात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा पाच जण अटकेत, चार जण फरार : १ लाख १७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बीआयटी कॉलेजसमोरील शेतशिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी ३ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास धाड टाकून पाच जणांना अटक केली आहे. या कारवाईत रोख रक्कम, मोबाईल फोन, मोटारसायकली आणि जुगाराचे साहित्य असा एकूण १ लाख १७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर चार जण पोलिसांना चकवा देत घटनास्थळावरून फरार झाले.

पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड हे पोलीस पथकासह नियमित गस्त घालत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, बीआयटी कॉलेजसमोरील साईनाथ साळवे यांच्या शेतशिवारात काही व्यक्ती ५२ पत्त्यांवर हारजीतचा जुगार खेळत आहेत. माहितीची खातरजमा करून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली.

पोलिसांचे पथक शेतशिवारात पोहोचताच तेथे काही जण प्रकाशाच्या उजेडात गोलाकार बसून जुगार खेळताना दिसून आले. पोलिसांनी परिसराला घेराव घालून कारवाई सुरू केली असता काही आरोपी मोटारसायकली सोडून शेताच्या दिशेने पळून गेले. मात्र, पोलिसांनी पाच जणांना घटनास्थळावरच ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये गुलाम राजीक गुलाम हादी शेख रा. बालाजी वॉर्ड, अमन लालू बोरकर रा. महाराणा प्रताप वॉर्ड, आदेश जालिंदर वानी रा. संतोषी माता वॉर्ड, समीर शफीउल्ला खान रा. रविंद्रनगर वॉर्ड आणि सैय्यद सादिक सैय्यद अलीम हुसेन रा. संतोषी माता वॉर्ड यांचा समावेश आहे.

तपासादरम्यान आरोपीं नितेश गोंधळी रा. दहेली, नितीन मोडक रा. मौलाना आझाद वॉर्ड, जुनेद रा. बल्लारपूर आणि रितेश सोनवणे रा. साईबाबा वॉर्ड हे घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.

कारवाईदरम्यान आरोपींकडून रोख रक्कम, दोन मोबाईल फोन, चार मोटारसायकली, जुगाराच्या डावावरील रोख रक्कम तसेच ५२ पत्त्यांचा संच असा एकूण १ लाख १७ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सर्व आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम १२ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास बल्लारपूर पोलीस करीत आहेत.

सदर कारवाई  पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमेश जोगदंड, पोहवा संतोष पंडीत, विकास जुमनाके, पोहवा जावेद, पोअं महेश कुकुडकर, लखन चव्हाण, शरदचंद्र कारुस, वैभव गाडगे सह उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पथक व बल्लारपूर ठाण्यातील गुन्हे शोध शाखेचे कर्मचारी यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos