महत्वाच्या बातम्या

 नवजात बालक विक्रीप्रकरणी संपूर्ण रॅकेट उघड करण्याची मागणी : भाजप महिला महानगर आघाडीचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : चंद्रपूर शहरात उघडकीस आलेल्या कथित नवजात बालक विक्री प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि जलदगतीने चौकशी करून संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करावा तसेच या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी, चंद्रपूर महानगरच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

भाजप महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूरमध्ये समोर आलेले कथित नवजात बालक विक्री प्रकरण अत्यंत गंभीर, अमानुष आणि मानवतेला काळिमा फासणारे असून, या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा तपास करत रामनगर पोलिसांनी आतापर्यंत केलेली कारवाई कौतुकास्पद असली तरी तपासादरम्यान आणखी काही महिलांना अटक झाल्यामुळे हे प्रकरण अधिक व्यापक स्वरूपाचे असण्याची शक्यता असून संपूर्ण रॅकेटचा शोध घेण्यासाठी तपास अधिक सखोलपणे करण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, विविध प्रसारमाध्यमे, सामाजिक माध्यमे आणि सार्वजनिक चर्चांमध्ये काही महिला पदाधिकाऱ्यांची नावे समोर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर कोणाचाही राजकीय, सामाजिक अथवा इतर कोणताही प्रभाव विचारात न घेता सर्व संबंधितांची निष्पक्ष आणि पारदर्शक चौकशी करण्यात यावी. तसेच उपलब्ध कागदपत्रे, आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल रेकॉर्ड, डिजिटल पुरावे आणि इतर सर्व बाबींची सखोल तपासणी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

भाजप महिला आघाडीने या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत, गुन्हेगाराला कोणताही पक्ष, जात किंवा धर्म नसतो, ही भूमिका स्पष्ट केली. तपासात कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित व्यक्तीचा सहभाग आढळल्यास त्याला कोणतीही राजकीय सवलत किंवा संरक्षण न देता भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच इतर लागू कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली.

याशिवाय, या संपूर्ण प्रकरणामागील मुख्य सूत्रधार, दलाल, सहकारी आणि इतर संबंधित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. भविष्यात अशा अमानुष घटनांची पुनरावृत्ती होऊ नये आणि नागरिकांचा कायदा व पोलीस प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ व्हावा, यासाठी या प्रकरणाचा सर्वंकष तपास करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी नगरसेविका सविता कांबळे, शीतल गुरनुले, पुष्पा उराडे, ॲड. सारिका संदूरकर, आशा देशमुख आणि सरला कुळसंगे यांची उपस्थिती होती.





  Print






News - Chandrapur




Related Photos