महत्वाच्या बातम्या

 गुटखा माफियांवर पोलिसांचा मोठा घाव : दोन संघटित टोळ्यांवर मिनी मोक्का अंतर्गत कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम १११ (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यातील गुटखा माफियांविरोधातील ही आतापर्यंतची महत्त्वपूर्ण कारवाई मानली जात आहे.

रामनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक ६५८/२०२६ व गुन्हा क्रमांक ६६४/२०२६ यांच्या तपासादरम्यान आरोपी संघटित पद्धतीने प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक व विक्री करून आर्थिक फायदा मिळवत असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांनी सातत्याने अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे केल्याचेही तपासात उघड झाले.

गुन्हा क्रमांक ६५८/२०२६ मध्ये टोळीप्रमुख वसीम अख्तर झिमरी रा. घुटकाळा वॉर्ड, चंद्रपूर तसेच टोळी सदस्य सिद्धांत माधव गोंडाणे व मोहम्मद अखिल शकील शेख यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. या प्रकरणात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त करण्यात आला होता.

तर गुन्हा क्रमांक ६६४/२०२६ मध्ये टोळीप्रमुख जयसुखलाल अंबाराम ठक्कर रा. विवेकानंद वॉर्ड, बल्लारपूर तसेच सदस्य अजयकुमार विजयकुमार गुंडोजवार यांच्यावर कारवाई करण्यात आली. या प्रकरणात प्रतिबंधित गुटखा, पान मसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता.

तपासादरम्यान संबंधित आरोपींविरुद्ध चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली तसेच इतर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, भारतीय दंड संहिता आणि भारतीय न्याय संहिता अंतर्गत अनेक गंभीर गुन्हे नोंद असल्याचे समोर आले. आर्थिक लाभासाठी संघटित स्वरूपात अवैध व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १११ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली.

जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण करणाऱ्या प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या अवैध व्यापाराविरुद्ध चंद्रपूर जिल्हा पोलीस दलाने कठोर भूमिका घेतली असून, अशा गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही अधिक प्रभावी आणि कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले, पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हिराचंद गव्हारे व सहायक पोलीस निरीक्षक सचिन राखोंडे यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.





  Print






News - Chandrapur




Related Photos