महत्वाच्या बातम्या

 सफाई कामगारांना कोरोना भत्ता मिळावा : भाकप-आयटकचे ग्रामविकास अधिकाऱ्यांना निवेदन, आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आलापल्ली (गडचिरोली) : कोरोना महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून गावाची स्वच्छता व निर्जंतुकीकरणाचे काम करणाऱ्या आलापल्ली ग्रामपंचायतीतील सफाई कामगारांना विशेष प्रोत्साहन भत्ता (कोरोना पैसे) मिळावा, या मागणीसाठी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकप) व ऑल इंडिया ट्रेड युनियन आयटक यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. कामगार संघटनांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी ग्रामविकास अधिकारी यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी प्रशासनाने दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

भाकपचे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार, जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार, तालुका सहसचिव कॉ. रितेश जॉई यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सन २०२० ते २०२२ या कोरोनाच्या गंभीर काळात सफाई कामगारांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून अहोरात्र सेवा बजावली. मात्र, दुर्दैवाने २०२६ साल उजाडूनही या कर्मचाऱ्यांना आजवर कोणताही विशेष प्रोत्साहन भत्ता मिळालेला नाही. ही बाब कामगारांवरील घोर अन्याय दर्शवणारी असल्याचे निवेदनात नमूद आहे.

संघटनेने आपल्या मागण्यांच्या समर्थनार्थ महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८, १५ वा वित्त आयोग निधी, स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) तसेच आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ या कायदेशीर तरतुदींचा दाखला दिला आहे. कोविड-१९ सारख्या राष्ट्रीय आपत्तीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हित जपणे व त्यांना योग्य मोबदला देणे ही शासनाची जबाबदारी असताना ग्रामपंचायत प्रशासनाने मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रामुख्याने ग्रामपंचायत अंतर्गत कार्यरत सर्व सफाई कामगारांना तात्काळ कोरोना प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा, २०२० ते २०२२ या कालावधीची थकीत रक्कम त्वरित अदा करावी, त्यासाठी १५ व्या वित्त आयोग किंवा इतर उपलब्ध निधीतून तरतूद करावी, पात्र कामगारांची अधिकृत यादी बनवून थेट लाभ द्यावा आणि भविष्यातील आपत्कालीन परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ठोस धोरण आखावे, अशा ठोस मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी कामगार नेत्यांनी स्पष्ट केले की, या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास भाकप व आयटकच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले जाईल. दरम्यान, ग्रामपंचायत प्रशासन लवकरच याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा सफाई कामगारांना आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos