पाण्याच्या शोधात आलेल्या सांबराला अज्ञात वाहनाची धडक : जखमी होऊन ठार


- वन्यजीव संरक्षणासाठी तातडीच्या उपाययोजनांची मागणी
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / बल्लारपूर : जुनोना जंगल परिसरातील वन्यजीवांच्या अपघाती मृत्यूचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसून, जुनोना-पोंभुर्णा मार्गावर भरदुपारी पुन्हा एका सांबराचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना गुरुवार,२८ मे रोजी दुपारी सुमारे १२ वाजताच्या सुमारास वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ४६७ मधील जंगल परिसरात घडली.
माहितीनुसार, पाण्याच्या शोधात रस्ता ओलांडत असताना भरधाव अज्ञात वाहनाने सांबराला जोरदार धडक दिली. अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या सांबराला वाचविण्याचा प्रयत्न सुरू असतानाच त्याचा वाटेत मृत्यू झाला.
शवविच्छेदन करणारे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचालवार यांनी सांगितले की, अपघातात सांबराचा पुढील उजवा व मागील पाय तुटला होता. तसेच जबडा तुटून छाती व पोटामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा.
जुनोना-पोंभुर्णा मार्ग वन्यजीवांसाठी मृत्यूचा सापळा ठरत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीच्या नोंदीनुसार, या मार्गावर आतापर्यंत जवळपास ४० वन्यजीवांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. चालू वर्षातच सात वन्यप्राण्यांनी जीव गमावला असून त्यात बिबट, दोन सांबर, चितळ, मसण्याऊद, कंठेरी शिंगळा घुबड व मुंगूस यांचा समावेश आहे.
हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीने या मार्गाच्या रुंदीकरणाला पूर्वीच विरोध दर्शविला होता. जुनोना जंगल हा वन्यजीवांचा महत्त्वाचा भ्रमणमार्ग असल्याने येथे मोठ्या प्रमाणात वन्यजीवांची हालचाल होत असते. रस्ता रुंद झाल्याने वाहनांचा वेग वाढून वन्यजीवांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशी भीती संस्थेने व्यक्त केली होती.
यासाठी स्पीड ब्रेकर, बॉक्स कल्व्हर्ट, उपशमन योजना तसेच संध्याकाळी ६ नंतर रस्ता बंद ठेवण्याची सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला करण्यात आली होती. मात्र, विभागाकडून केवळ तोंडी आश्वासन देण्यात आले आणि रस्त्याचे रुंदीकरण मोठ्या प्रमाणावर करण्यात आले. आता त्याचे परिणाम वन्यजीवांना भोगावे लागत असल्याचा आरोप संस्थेकडून करण्यात आला आहे.
या मार्गावर वाघ, अस्वल, बिबट, सांबर, चितळ, रानमांजर, मसण्याऊंद तसेच विविध सरीसृपांचा वावर असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. नुकतेच कारवा परिसरात एका रानगव्याला जखमी अवस्थेत पाहण्यात आले होते.
दरम्यान, यापूर्वी बिबट्याच्या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता विवेक अंबुले यांना संस्थेकडून पत्र देण्यात आले होते. मात्र, त्यावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
अलीकडेच कार्यकारी अभियंता टांगले यांची भेट घेऊन संस्थेकडून वन्यजीवांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. त्यावेळी आवश्यक ठिकाणांची माहिती दिल्यास रस्ता सुरक्षा समिती, वनविभाग आणि हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीच्या संयुक्त सर्वेक्षणातून उपशमन योजना राबविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
घटनेची माहिती हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीचे सदस्य कुणाल पुरके यांनी वनविकास महामंडळाला दिली. त्यानंतर वनविकास महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पुढील कारवाई केली.
या वेळी हॅबिटॅट कंझर्व्हेशन सोसायटीचे अध्यक्ष दिनेश खाटे, सदस्य अनिकेत वनकर, अभिषेक गजबे, इमरान पठाण तसेच वनविकास महामंडळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित मेश्राम, वनपाल बी. ए. पांचाळ, जी. बी. लुटे, कु. एस. एस. पंधरे व अन्य वनकर्मचारी उपस्थित होते.
News - Chandrapur




Petrol Price




