वन्यजीव हल्ल्यातील पिडीतास सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकार : न्या.विवेक देशमुख

- बोरधरण येथे जिल्हास्तरीय चर्चासत्र व प्रशिक्षण कार्यशाळा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वर्धा : वन्यजीव हल्ल्यातील पिडीत व त्यांच्या कुटुंबियांना केवळ आर्थीक मदत नव्हे तर संपुर्ण न्याय सहाय्य, मानसिक आधार व त्यांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक मदत करणे गरजेचे आहे. त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याचा अधिकारी आहे, असे प्रतिपादन जिल्हा विधीसेवा प्राधिकरणाचे सचिव न्या.विवेक देशमुख यांनी केले.
मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना न्याय मिळवून देण्याकरीता राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाद्वारे योजना सुरु करण्यात आली आहे. मानव आणि वन्यजीव यांच्यात वाढत चाललेला संघर्ष, त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक, पर्यावरणीय व कायदेशीर समस्या तसेच वन्यजीव हल्ल्यातील पीडितांना न्याय, सहाय्य व पुनर्वसन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बोरधरन येथे जिल्हास्तरीय चर्चास्तर व प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरिष्ठ दिवानी न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव विवेक देशमुख होते. प्रमुख अतिथी म्हणून उप वनसंरक्षक हरवीर सिंग, बोर व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक मंगेश ठेंगडी उपस्थित होते. देशमुख यांनी राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाची मानव-वन्यजीव संघर्षातील पीडितांना न्याय मिळवून देण्याकरीता योजना, २०२५ बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
योजनेंतर्गत वन्यजीव हल्ल्यातील पीडितांना त्वरित व मोफत विधी सहाय्य देणे, नुकसानभरपाई प्रक्रियेमध्ये आवश्यक कागदपत्रे व कायदेशीर मार्गदर्शन पुरविणे, पीडित कुटुंबांना कल्याणकारी योजनांचा लाभ देणे, दुर्गम व जंगल परिसरातील नागरिकांमध्ये विधी साक्षरता व जनजागृती निर्माण करणे, लोकअदालतीच्या माध्यमातून प्रलंबित प्रकरणे जलद निकाली काढणे, विधी स्वयंसेवकांच्या माध्यमातून सहाय्य पोहोचविणे, मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी स्थानिक समुदायाचा सहभाग वाढविणे हा योजनेचा उद्देश असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ व वन्यजीव अभ्यासक डॉ.विरेंद्र प्रताप यादव यांनी मानव-वन्यजीव सहअस्तित्व आव्हाने व उपाय या विषयावर मार्गदर्शन केले. वाघ हा जंगल परिसंस्थेचा अत्यंत महत्वाचा घटक असून जंगलातील जैवविविधतेचे संतुलन राखण्यात त्याची महत्वपूर्ण भूमिका आहे. जंगलातील नैसर्गिक अधिवास कमी होणे, पाण्याची टंचाई, जंगलांवरील मानवी अतिक्रमण व वन्यजीव मार्ग बंद होणे ही संघर्षाची प्रमुख कारणे असल्याचे त्यांनी सांगितले.
पीपल फॉर अॅनिमल्स संस्थेचे सचिव आशिष गोस्वामी यांनी वन्यजीव संवर्धनासाठी पर्यावरणीय संतुलन राखणे, वनक्षेत्रांचे संरक्षण करणे, वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासाचे जतन करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी वन विभागातील अधिकाऱ्यांनी क्षेत्रीय पातळीवरील अडचणी, वन्यजीव बचाव मोहिमा, नुकसानभरपाई प्रक्रिया तसेच स्थानिक नागरिकांच्या समस्यांवर चर्चा केली.
प्रास्ताविक मनिष सावरकर यांनी केले. संचलन श्रीकांत पवार यांनी केले. कार्यक्रमास वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, पॅनल अधिवक्ता, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
News - Wardha




Petrol Price




