महत्वाच्या बातम्या

 जनगणना २०२६ : नागरिकांना घरबसल्या सेल्फ-एन्युमरेशनची सुविधा; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या जनगणना २०२६ साठी यंदा नागरिकांना मोठा दिलासा देणारी डिजिटल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आता प्रत्येक कुटुंबाला मोबाईल किंवा संगणकाच्या माध्यमातून घरबसल्या स्वतःची जनगणनेची माहिती भरता येणार आहे. यासाठी सेल्फ-एन्युमरेशन पोर्टल सुरू करण्यात आले असून त्याद्वारे संपूर्ण प्रक्रिया सुलभ करण्यात आली आहे.

या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केले.

प्रक्रिया ४ टप्पे आणि ९ स्टेप्समध्ये -
सेल्फ-एन्युमरेशनची संपूर्ण प्रक्रिया चार टप्पे आणि नऊ स्टेप्समध्ये विभागली आहे.

नोंदणी -
सुरुवातीला पोर्टलवर लॉगिन करून राज्य निवडावे लागेल. त्यानंतर कुटुंबप्रमुखाचे नाव, १० अंकी मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी (ऐच्छिक) भरून नोंदणी करावी लागेल. एका मोबाईल क्रमांकावरून एका कुटुंबाचीच नोंदणी करता येईल. तसेच कुटुंबप्रमुखाचे नाव आणि निवडलेली भाषा नंतर बदलता येणार नाही.

पडताळणी व स्थान निश्चिती -
नोंदणीनंतर ओटीपीद्वारे पडताळणी केली जाईल. त्यानंतर जिल्हा, पिन कोड, गाव किंवा शहराची माहिती भरून नकाशावर लाल मार्करच्या साहाय्याने घराचे अचूक स्थान निश्चित करावे लागेल.

माहिती भरणे व तपासणी -
या टप्प्यात हाऊसलिस्टिंग व हाऊसिंग सेन्ससची प्रश्नावली भरावी लागेल. भरलेली माहिती ‘प्रिव्ह्यू’मध्ये तपासून पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

अंतिम सबमिट व SE ID -
Final Submit केल्यानंतर ११ अंकी SE ID (H ने सुरू होणारा) नागरिकांच्या मोबाईलवर SMS व ई-मेलद्वारे पाठवला जाईल.

गणक आल्यावर SE ID दाखवणे आवश्यक -
जनगणना कर्मचारी घरभेटीला आल्यावर नागरिकांनी आपला SE ID दाखवणे आवश्यक आहे. SE ID जुळल्यास माहिती तत्काळ पुष्टी केली जाईल; अन्यथा कर्मचारी नव्याने माहिती नोंदवतील.

Final Submit नंतर बदल शक्य नाही -
जनगणना अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, एकदा Final Submit केल्यानंतर कोणतीही माहिती बदलता येणार नाही. त्यामुळे नागरिकांनी माहिती काळजीपूर्वक भरावी. ड्राफ्ट सेव्ह करून नंतर सबमिट करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

डिजिटल पद्धतीमुळे वेग, पारदर्शकता आणि अचूकता -
या डिजिटल उपक्रमामुळे जनगणनेचे काम अधिक जलद, पारदर्शक आणि अचूक होणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सेल्फ-एन्युमरेशनमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले.

पत्रकार परिषदेला निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण, उपजिल्हाधिकारी विकास व्यवहारे, जनगणना विभागाचे रवीसागर पटेल तसेच जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos