महत्वाच्या बातम्या

 उपोषणकर्त्याची प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल : माजी खासदार डॉ. अशोक नेते यांनी घेतली भेट


- रुग्णसेवेचा घेतला आढावा; प्रकृतीची विचारपूस करत दिले धीर

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : वडिलोपार्जित शेताकडे जाणाऱ्या वहीवाटीच्या रस्त्यासाठी आणि शेती अवजारे ने-आण करण्यासाठी सुकर मार्गाची मागणी करत उपोषण करणाऱ्या गोकुळनगर येथील मुकुंदा नारायण उंदिरवाडे यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच माजी खासदार तथा भाजपचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोक नेते यांनी रुग्णालयात धाव घेऊन त्यांच्या प्रकृतीची आस्थेने विचारपूस केली.

शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी मुकुंदा उंदिरवाडे यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देऊन उपोषण सुरू केले होते. मात्र, कडक उन्हाळा आणि उपोषणामुळे निर्माण झालेला अशक्तपणा यामुळे त्यांना चक्कर येणे व रक्तदाबाचा त्रास जाणवू लागला. खबरदारीचा उपाय म्हणून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.

डॉ. अशोक नेते यांनी रुग्णालयात दाखल होताच थेट उपोषणकर्त्याच्या खाटेजवळ जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली. डॉक्टरांकडून उपचारांची माहिती घेत त्यांना योग्य व तत्पर वैद्यकीय सेवा देण्याबाबत सूचना केल्या. तसेच उंदिरवाडे यांच्या कुटुंबीयांना धीर दिला.

आरोग्य व्यवस्थेची घेतली पाहणी -
केवळ उपोषणकर्त्याची विचारपूस न करता, डॉ. नेते यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डांना भेट दिली. यावेळी त्यांनी तेथे उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांशी संवाद साधून डॉक्टरांची उपस्थिती, औषधोपचार आणि जेवणाची सोय यांसारख्या सोयी-सुविधांबाबत थेट रुग्णांकडूनच माहिती घेतली. रुग्णालयातील स्वच्छता आणि आरोग्य सेवेची गुणवत्ता अधिक सक्षम करण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक त्या सूचना केल्या. माजी खासदारांच्या या भेटीमुळे रुग्णांमध्ये आत्मीयतेची भावना निर्माण झाली असून, जनसेवेप्रती असलेली त्यांची बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos