गडचिरोलीत संत गोरोबा काका पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम उत्साहात : कुंभार समाज भवन पूर्णत्वास नेण्याची आमदारांची ग्वाही


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील गोकुळ नगर परिसरात श्री संत शिरोमणी गोरोबा काका विश्वस्त मंडळ व कुंभार समाजाच्या वतीने आयोजित पुण्यतिथी कार्यक्रम व सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित राहून संत गोरोबा काका यांच्या चरणी नतमस्तक होत अभिवादन केले.
यावेळी बोलताना आमदार डॉ. नरोटे यांनी सांगितले की, संतांच्या विचारांचा वारसा जपणारा कुंभार समाज आजही आपल्या श्रमातून संस्कृती जिवंत ठेवत आहे. समाजाच्या विकासासाठी कुंभार समाज भवनाच्या प्रलंबित कामांचा आढावा घेण्यात आला असून हे उर्वरित काम आमदार निधीतून तातडीने पूर्ण करून देण्याची ग्वाही त्यांनी दिली. हे भवन केवळ एक वास्तू नसून समाजाचे शैक्षणिक आणि सामाजिक केंद्र म्हणून विकसित व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पारंपरिक मातीच्या कलेला आधुनिक ‘फाईन आर्ट’ची जोड देणे ही काळाची गरज असल्याचे नमूद करत, स्थानिक कलाकारांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शहरात ट्रेडिंग सेंटर उभारण्याचा विचार सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामुळे कुंभार समाजाच्या उत्पादनांना योग्य सन्मानासह चांगला आर्थिक मोबदला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच खादी ग्रामोद्योग संघ, नागपूर तर्फे आयोजित १० दिवसांच्या विद्युत चलित चाक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
तरुण पिढीने पारंपरिक कौशल्य जपत आधुनिक शिक्षणातही प्रगती साधावी, डॉक्टर, इंजिनिअर होऊन प्रशासकीय सेवेत स्थान मिळवावे तसेच ई-कॉमर्सच्या माध्यमातून व्यवसाय जागतिक स्तरावर नेण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही आमदारांनी केले.
या कार्यक्रमास नगराध्यक्ष प्रणोती निंबोरकर, नगरसेविका मेघा वरघंटीवार, कुंभार समाज समितीचे अध्यक्ष एकनाथजी बूरबांदे, रामजी खोबरे तसेच समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
News - Gadchiroli




Petrol Price




