घाटंजी बसस्थानकावर थंड पाणपोई चा लोकार्पण सोहळा : प्रवाशांना दिलासा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी : घाटंजी येथील बसस्थानकवर वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर तापमानाने ४० ते ४२ अंशांचा टप्पा ओलांडला असून, बसस्थानकावरील प्रवाशांना पिण्याच्या पाण्याची तीव्र समस्या भेडसावत होती. उपलब्ध पाणीही अत्यंत गरम असल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने हा प्रश्न गंभीर बनला होता.
याच पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत घाटंजीतील काही नागरिक पुढे सरसावले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तसेच स्व. प्रभाबाई अक्कलवार, स्व. दादासाहेब कोमावार व स्व. लक्ष्मण शामराव ढवळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ थंड पिण्याच्या पाण्याची पाणपोई उभारण्यात आली. यात किशोर अक्कलवार, अनिल कोमावार व गजानन ढवळे यांच्या सौजन्याने मंगळवार ७ एप्रिल २०२६ रोजी शुभमुहूर्तावर या पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले.
या उपक्रमासाठी पांढरकवडा आगार प्रमुख आशिष काकडे यांनी बसस्थानक परिसरात जागा उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्याबद्दल उपस्थितांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पाणपोई उद्घाटन प्रसंगी पांढरकवडा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे आगार प्रमुख आशिष काकडे, वाहतूक नियंत्रक सविता कामळे, अनंत कटकोजवार, अनिल कोमावार, बातमीदार अनंत नखाते (पुण्यनगरी), महेंद्र देवतळे (विदर्भ कल्याण), संतोष अक्कलवार (दिव्य मराठी), अरुण कांबळे (नमो महाराष्ट्र), दिनेश गाऊत्रे (लोकमत), संतोष पोटपिल्लेवार (लोकदूत), किशोर अक्कलवार, विजय मोहिजे, कविता मोहिजे यांच्यासह अनेक प्रवासी व नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, या उपक्रमामुळे घाटंजी येथील बसस्थानकावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, नागरिकांकडून या सामाजिक कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
News - Rajy




Petrol Price




