महत्वाच्या बातम्या

 नागपूर : पतीच्या आत्महत्येस पत्नी दोषी नाही : मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : वैवाहिक जीवनातील सामान्य कलहामुळे पतीने आत्महत्या केली, तरी पत्नीला जबाबदार ठरवता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती उर्मिला जोशी-फलके यांनी एका प्रकरणात स्पष्ट केले.

हे प्रकरण अमरावती येथील असून, २६ नोव्हेंबर २०१९ रोजी पतीने रेल्वेखाली जाऊन आत्महत्या केली. त्यानंतर राजापेठ पोलिसांनी सासऱ्याच्या तक्रारीवरून पत्नीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केला होता.

तक्रारीत पत्नीवर पतीला शिवीगाळ, मारहाण, पैशांची मागणी, खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी देणे आणि विवाहबाह्य संबंध ठेवण्याचे आरोप होते. परंतु, न्यायालयाने स्पष्ट केले की, केवळ या आरोपांवरून पत्नीला पतीच्या आत्महत्येस जबाबदार ठरवता येत नाही.

न्यायालयाच्या तपासात असे आढळले की, पती आणि पत्नी यांच्यात तीव्र मतभेद होते आणि दोघांनीही एकमेकांवर पोलिस ठाण्यात तक्रारी नोंदवलेल्या होत्या. पतीवरही मानसिक व शारीरिक छळ आणि विवाहबाह्य संबंध ठेवल्याचे पत्नीने सांगितले होते. तथापि, पत्नीने पतीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नाही, आणि पतीने आत्महत्या करण्याचा निर्णय स्वतंत्रपणे घेतला, असे न्यायालयाने नमूद केले.

एफआयआर रद्द -
पत्नीने पोलिसांनी दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने पत्नी कोणत्याही गुन्ह्यात दोषी नाही, असे आढळल्याने याचिका मंजूर केली आणि एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले.

हा निर्णय वैवाहिक कलहामुळे घडलेल्या घटनांमध्ये जबाबदारी ठरवताना परिस्थितीचे सर्व पैलू विचारात घेण्याचे महत्त्व अधोरेखित करतो.





  Print






News - Nagpur




Related Photos