चंद्रपूर-गडचिरोलीतील जीवघेण्या प्रदूषणाविरोधात युवासेना आक्रमक : मातोश्रीवर आदित्य ठाकरेंची विशेष बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्ये वाढत्या औद्योगिकीकरणामुळे निर्माण झालेल्या गंभीर प्रदूषणाच्या प्रश्नावर युवासेना आता आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे. युवासेना प्रमुख तथा माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील मातोश्री निवासस्थानी विशेष बैठक घेऊन दोन्ही जिल्ह्यांतील प्रदूषणाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीत चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील पर्यावरणीय समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत चंद्रपूरचे युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांनी दोन्ही जिल्ह्यांतील प्रदूषणाची वस्तुस्थिती मांडली. कोळसा खाणी, औष्णिक वीज केंद्रे, सिमेंट उद्योग तसेच विविध औद्योगिक प्रकल्पांमुळे वाढणारे वायू व धूळ प्रदूषण नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरत असल्याची माहिती त्यांनी दिली. यासोबतच पर्यावरणीय समतोल बिघडत असून स्थानिक नागरिकांना विविध आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.
प्रदूषणाच्या वाढत्या संकटामुळे नागरिकांचे जीवनमान प्रभावित होत असून या प्रश्नावर प्रभावी लढा उभारण्याची आवश्यकता बैठकीत व्यक्त करण्यात आली. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती मोहीम राबविण्यासह नागरिकांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभारण्याबाबतही चर्चा झाली.
दरम्यान, बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या कार्यक्षेत्रातील स्थानिक समस्या आणि नागरिकांचे प्रश्न प्रभावीपणे जनतेसमोर मांडावेत, असे सांगताना केवळ समस्या मांडून न थांबता त्याच्या निराकरणासाठी शासन आणि प्रशासनावर लोकशाही मार्गाने दबाव निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी केले. जनतेच्या हिताच्या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
चंद्रपूर जिल्ह्यातील औष्णिक वीज केंद्रे, सिमेंट कारखाने आणि कोळसा खाणींमुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. तर गडचिरोली जिल्ह्यात विविध औद्योगिक प्रकल्पांच्या विस्तारामुळे पर्यावरणीय समतोल धोक्यात येत असल्याची चिंता व्यक्त करण्यात आली. या पार्श्वभूमीवर दोन्ही जिल्ह्यांतील प्रदूषणाच्या प्रश्नावर युवासेना अधिक तीव्रतेने आवाज उठवणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
या बैठकीला युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे यांच्यासह चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व युवा सैनिक उपस्थित होते. मातोश्रीवर झालेल्या या बैठकीनंतर पर्यावरण संरक्षण आणि प्रदूषणमुक्तीसाठी युवासेना मोठी चळवळ उभारण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत असून, आगामी काळात या प्रश्नावर संघटनेकडून विविध आंदोलनात्मक कार्यक्रम हाती घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
News - Chandrapur




Petrol Price




