महत्वाच्या बातम्या

 लाखांदूर जवळ भीषण अपघात : पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तालुक्यातील मानेगाव-बोरगाव फाट्याजवळ गुरुवारी रात्री एका भीषण अपघाताची घटना घडली. भरधाव वेगाने येणाऱ्या एका पिकअप वाहनाने दुचाकीला समोरून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत ज्ञानेश्वर भास्कर कठाणे (३८, रा. मानेगाव) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे सहकारी चहीराम कठाणे (३४) हे गंभीर जखमी झाले आहेत.

घटनेचा थरार -
मिळालेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर कठाणे आणि चहीराम कठाणे हे दोघेही गुरुवारी रात्री आपल्या दुचाकीने नागपरसोडी येथे कडधान्य आणण्यासाठी गेले होते. काम आटोपून घराकडे परतत असताना रात्री ८ वाजेच्या सुमारास मानेगाव-बोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला. समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप चालकाने दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचा चक्काचूर झाला आणि ज्ञानेश्वर यांचा जागीच प्राण गेला.

रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू -
अपघातानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच ज्ञानेश्वर कठाणे यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

जखमीवर उपचार सुरू -
या घटनेत गंभीर जखमी झालेले चहीराम कठाणे यांच्यावर सध्या लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.  या घटनेमुळे मानेगाव परिसरात शोककळा पसरली असून, वेगाने वाहन चालवणाऱ्या चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





  Print






News - Bhandara




Related Photos