नागपूर विद्यापीठाच्या सांख्यिकी विभागाचा सुवर्ण महोत्सव उत्साहात पार पडला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पदव्युत्तर सांख्यिकी विभागाने १६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत सुवर्ण महोत्सवाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले. महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील सांख्यिकी विभागात पार पडलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांसह प्राध्यापक, संशोधक आणि औद्योगिक क्षेत्रातील तज्ज्ञांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
महोत्सवाच्या निमित्ताने फ्रॉम आर्टिफिशियल इंटेलिजेंस टू अग्मेंटेड इंटेलिजेंस: रिव्हरींग द मॅथेमॅटिकल माइंड फॉर ह्यूमन ग्रोथ या विषयावर दोन दिवसांची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. मनाली मकरंद क्षीरसागर यांच्या हस्ते झाले. अध्यक्षीय भाषणात त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता महत्त्वाची असली तरी तिच्यावर पूर्ण अवलंबून राहू नये, असे सांगितले. एआयचा वापर मानवी क्षमतांचा विकास करण्यासाठी सहाय्यक साधन म्हणून करावा, पर्याय म्हणून नव्हे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत प्रमुख पाहुणे टीसीएस मिहानचे सेंटर हेड अरविंद कुमार उपस्थित होते. त्यांनी मानवी बुद्धिमत्ता कोणत्याही तंत्रज्ञानापेक्षा श्रेष्ठ असल्याचे सांगितले व एआयचा प्रभावी वापर संशोधन, डेटा विश्लेषण आणि नवोन्मेषासाठी करावा, असे विद्यार्थ्यांना आवाहन केले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. गणेश केदार यांनी केले. त्यांनी आधुनिक शिक्षणात, विशेषतः गणित व सांख्यिकी अभ्यासक्रमात कृत्रिम बुद्धिमत्तेचे एकत्रीकरण किती महत्त्वाचे आहे, यावर भर दिला. कार्यशाळेत मेघना मराठे, मनीषा जाधव, सौरभ कुलकर्णी, डॉ. सिद्धार्थ चौरसिया, डॉ. पाणिनी तेलंग आणि डॉ. प्रिती गोसावी यांनी AI, डेटा सायन्स, शिक्षणशास्त्र व संशोधन क्षेत्रातील विविध पैलूंवर मार्गदर्शन केले.
कार्यशाळेच्या समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे आयक्यूएसी संचालक डॉ. नंदकिशोर करडे होते. त्यांनी विद्यापीठ पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले आणि विद्यार्थ्यांना एम.एस्सी. अभ्यासक्रमासाठी विभागांची निवड करण्याचे आवाहन केले.
१८ मार्च रोजी संलग्न महाविद्यालयांतील पदवी विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. उद्घाटन डॉ. उमेश पालिकुंडवार यांनी केले, तर प्रमुख पाहुणे आयआयएल माजी संचालक डॉ. राजेश सिंग उपस्थित होते. त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानात सांख्यिकी ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. मुक्ता देशपांडे यांनी सांख्यिकी विभागाच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा सादर केला, तर डॉ. मंजिरी गजार्लावार यांनी आभार मानले.
स्पर्धांमध्ये एकूण ३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. पोस्टर सादरीकरण स्पर्धेत पायल गुप्ता शिवाजी सायन्स कॉलेज प्रथम, पियुषी वहाणे प्रेरणा कॉलेज द्वितीय, आणि वेदांशी चाहांदे (धरमपेठ सायन्स कॉलेज) तृतीय क्रमांक पटकावला. वक्तृत्व स्पर्धेत स्वरा आकांत (धरमपेठ सायन्स कॉलेज) विजयी ठरली, तर पॉवरपॉइंट सादरीकरण स्पर्धेत निवेश मेश्राम प्रथम क्रमांक मिळवला. पारितोषिक वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. संजय ढोबळे होते.
कार्यक्रमाच्या समारोप भाषणात डॉ. गणेश केदार यांनी सर्व सहभागी, प्राध्यापक आणि वक्ते यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षापासून गणित विभागात बी.एस्सी. सायबर सायन्स, बी.एस्सी. ड्रोन सायन्स, बी.एस्सी. (ऑनर्स) गणित, तसेच डेटा सायन्स, एआय, सायबर सिक्युरिटी, फायनान्स व ॲक्च्युरियल सायन्स आणि SAP-ERP सिस्टम्स या विशेष अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. तसेच एम.एस्सी. गणित व एम.एस्सी. डेटा सायन्स अभ्यासक्रम विज्ञान व अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतील. या कार्यशाळेला विविध महाविद्यालये व विद्यापीठ विभागांमधील १७२ सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
News - Nagpur




Petrol Price




