विदर्भात ४८ तासांत वादळी पाऊस आणि गारपीट : हवामान विभागाचा यलो अलर्ट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : विदर्भात सध्या हवामानात लक्षणीय बदल होत असून, हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.
हवामान तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, विदर्भातील बहुतांश भाग सध्या ढगाळ वातावरणात आहे आणि पुढील ४८ तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाची गारपीटही होऊ शकते.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये आज दुपारी ४ नंतर पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. विशेषतः नागपूर, गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह गारपीट होऊ शकते.
बुलढाणा, अकोला, चंद्रपूर आणि भंडारा येथे ताशी सुमारे ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे, तसेच विजांसह पावसाची शक्यता आहे. वर्धा, गडचिरोली, यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
याशिवाय, मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात ताशी ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून, तेथेही विजांसह पावसाची शक्यता आहे.
हवामान विभाग नागरिकांना सजग राहण्याचे आवाहन करत आहे आणि बाहेर जाताना योग्य खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.
News - Nagpur




Petrol Price




