काळीज पिळवटणारी घटना! धावत्या दुचाकीने घेतला पेट : पत्नी-मुलाच्या डोळ्यांदेखत पतीचा जिवंत होरपळून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालूका प्रतिनिधी / एटापल्ली : विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात, पण कधीकधी नियती इतकी क्रूर असते की आनंदाचे क्षण क्षणात शोकात बदलतात. नात्याच्या गाठी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीवर काळाने असाच घाला घातला.
आपल्या नातेवाईकाचे लग्न जुळवून आनंदाने घरी परतत असताना चालत्या दुचाकीने अचानक पेट घेतला आणि या भीषण आगीत होरपळून एका ४२ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना एटापल्ली तालुक्यातील बारसेवाडा मार्गावर १३ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली.
आनंदाचा प्रवास ठरला अखेरचा -
मिळालेल्या माहितीनुसार, सिमन दसरू हिचामी (४२ वर्ष, रा. कृष्णार, ता. एटापल्ली) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. सिमन हे बुधवारी (१३ मार्च) आपल्या नातेवाईकाचे लग्न जुळवण्यासाठी चंदनवेली येथे गेले होते. तिथे सर्व बोलणी नीट झाली, नात्याच्या गाठी पक्क्या झाल्या. आनंदाच्या वातावरणात जेवण आटोपून सिमन आपल्या दुचाकीने (क्रमांक: एमएच ३३ एई- २७३९) घराकडे निघाले होते.
काही कळण्यापूर्वीच आगीने वेढले -
एटापल्ली - बारसेवाडा रोडवर शहरापासून अवघ्या ३ किमी अंतरावर असताना अचानक त्यांच्या चालत्या दुचाकीने पेट घेतला. आगीने इतक्या वेगाने रौद्र रूप धारण केले की सिमन यांना गाडीवरून उतरण्याची किंवा स्वतःला सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
हृदयद्रावक दृश्य: पत्नी आणि मुलाचा आक्रोश -
या भीषण घटनेची सर्वात चटका लावणारी बाब म्हणजे, सिमन यांची पत्नी आणि मुलगा दुसऱ्या दुचाकीने त्यांच्या पाठीमागूनच येत होते. आपल्या डोळ्यादेखत पती आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे पाहून त्यांनी आरडाओरड करत मदतीसाठी धाव घेतली. पत्नी आणि मुलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र आगीची तीव्रता एवढी भीषण होती की सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. डोळ्यांदेखत पतीचा असा अंत झाल्याने पत्नीने घटनास्थळीच जो आक्रोश केला, त्याने संपूर्ण परिसर हेलावून गेला.
पोलिस तपास आणि फॉरेन्सिक टीम पाचारण -
घटनेची माहिती मिळताच एटापल्ली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रकरणाचे गांभीर्य पाहून फॉरेन्सिक लॅबच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवला आहे. धावत्या दुचाकीने अचानक पेट का घेतला? हा शॉर्ट सर्किटचा प्रकार होता की अन्य काही तांत्रिक बिघाड, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.
News - Gadchiroli




Petrol Price




