महत्वाच्या बातम्या

 तुझे पुन्हा लग्न लावून देतो म्हणत मुलीला घरात डांबून ठेवले : हायकोर्टाच्या आदेशाने प्रेमीयुगुलाचे पुनर्मिलन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : आंतरजातीय विवाह केलेल्या तरुणीला कुटुंबीयांनी घरात बळजबरीने डांबून ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे संबंधित कुटुंबीयांना माघार घ्यावी लागली आणि अखेर त्या प्रेमीयुगुलाचे पुन्हा एकत्र येणे शक्य झाले. या घटनेमुळे मियां बीवी राजी तो क्या करेगा काजी या म्हणीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील पवन आणि बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील पूनम (दोन्ही नावे काल्पनिक) यांनी १६ जानेवारी २०२६ रोजी अमरावती येथील संत गजानन महाराज मंदिरात हिंदू रीतीरिवाजांनुसार विवाह केला. त्यानंतर त्यांनी चंद्रविला ट्रस्टकडे विवाहाची नोंदणीही केली. काही दिवस अकोला येथे राहिल्यानंतर हे दोघे उत्तर भारतात निघून गेले.

दरम्यान, पूनमच्या वडिलांनी ३१ जानेवारी २०२६ रोजी अकोल्यातील सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांनी पूनमशी संपर्क साधून पवनसोबतच तिचे लग्न लावून देण्याचे आश्वासन देत तिला परत बोलावले. मात्र, अकोल्यात परत आल्यानंतर त्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. उलट पूनमला जबरदस्तीने घरी नेऊन डांबून ठेवले. तसेच पवनला पूनमला विसरून जाण्याची, अन्यथा वाईट परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही देण्यात आली.

या प्रकारानंतर पवनने पोलिस ठाण्यात तक्रार केली परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पवनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. न्यायमूर्ती अनिल पानसरे आणि न्यायमूर्ती निवेदिता मेहता यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने पूनमला हजर करण्याचा आदेश दिला. त्यानुसार पोलिसांनी १० मार्च रोजी तिला न्यायालयात हजर केले. यावेळी पूनमने न्यायालयाला सांगितले की, तिने स्वतःच्या इच्छेने पवनसोबत विवाह केला असून तिला त्याच्यासोबतच राहायचे आहे. तिचे म्हणणे ऐकून न्यायालयाने पूनमला पवनच्या ताब्यात देण्याचा आदेश दिला. पवनतर्फे अ‍ॅड गणेश मते यांनी बाजू मांडली.

अशी जुळली त्यांची मने -
पवन एका वैद्यकीय कंपनीत व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहे, तर पूनम मेडिकल स्टोअरमध्ये कर्मचारी आहे. २०२२ मध्ये त्यांची ओळख झाली. सतत संपर्कात राहिल्यामुळे त्यांची मैत्री प्रेमात बदलली आणि त्यांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पूनम उच्च जातीची असल्याने तिच्या कुटुंबीयांनी पवनला स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे अखेर त्यांनी पळून जाऊन विवाह केला.





  Print






News - Nagpur




Related Photos