महत्वाच्या बातम्या

 ग्रँट ट्रंक एक्सप्रेसच्या पार्सल डब्यात आग : रेल्वे प्रशासनाची तत्काळ कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : नवी दिल्ली–चेन्नईदरम्यान धावणाऱ्या ग्रँट ट्रंक एक्सप्रेस या गाडीच्या पार्सल डब्याला आज अचानक आग लागल्याची घटना घडली. नागपूरहून सेवाग्रामकडे जाणाऱ्या मार्गावर सिंधी (रेल्वे) ते तुळजापूर दरम्यान पोल क्रमांक ७८४ जवळ गाडी उभी असताना ही घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, गाडी थांबलेली असताना पार्सल डब्यातून धूर निघताना दिसून आला. काही वेळातच आग लागल्याचे स्पष्ट झाले. परिस्थिती गंभीर असल्याचे लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने तात्काळ गाडी थांबवून मदतकार्य सुरू केले.

घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल (आरपीएफ) चे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न तातडीने सुरू करण्यात आले. काही वेळातच आगीवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात यश आले.

दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. रेल्वे प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे काही रेल्वेगाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

वेळेत करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली असून प्रवासी आणि रेल्वे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास सोडला आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos