घराच्या चावीचा गैरवापर करून ६० हजारांचा ऐवज लंपास : चंद्रपुरात घरफोडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : घराच्या बाथरूमच्या खिडकीवर ठेवलेल्या चावीचा वापर करून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश केला आणि कपाटातील ३० हजार रुपये रोख व ३० हजार रुपये किमतीचे सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र असा एकूण ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना चंद्रपुरातील विनया गेट परिसरातील दानववाडी येथे उघडकीस आली.
कौशल्या जगदीश पिसे (वय ५०) या मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्या मागील तीन ते चार वर्षांपासून दिलीप नवघरे यांच्या घरी भाड्याने राहतात. कामावर जाताना त्या घराची चावी बाथरूमच्या खिडकीवर ठेवत असत. २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी गोदरेज कपाटाच्या आतील लॉकरमध्ये ३० हजार रुपये रोख आणि सात ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र ठेवले होते. त्यानंतर लॉकर बंद करून त्या मुलासह कामावर गेल्या.
२७ नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास त्या घरी परतल्या. घर उघडून आत गेल्यानंतर कपाट उघडून पाहिले असता लॉकरची चावी साडीवर ठेवलेली दिसली. संशय आल्याने त्यांनी लॉकर उघडून पाहिले असता त्यातील रोख रक्कम आणि सोन्याचे मंगळसूत्र गायब असल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने घराबाहेर ठेवलेल्या चावीचा वापर करून दरवाजाचे कुलूप उघडले आणि घरात प्रवेश करून हा ६० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची तक्रार त्यांनी पोलिसांत दिली.
या प्रकरणी कौशल्या पिसे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नोंद घेतली असून, पुढील तपास चंद्रपूर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्याम गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष दंडेवार करीत आहेत.




Petrol Price




