नगरपरिषदांच्या विकासकामांना गती द्या : प्रस्तावांना तातडीने प्रशासकीय मान्यता घ्या


- विकास आराखड्यांसाठी शासनाकडे पाठपुरावा करा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद व नगरपंचायतींनी विकासकामांचे प्रस्ताव तातडीने सादर करून त्यांना प्रशासकीय मान्यता घ्यावी. मंजूर कामांची अंमलबजावणी वेगाने करावी तसेच विकास आराखड्यांना मंजुरी मिळविण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. नगरपरिषद नगरपंचायतींच्या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनुप खांडे, नगर प्रशासन विभागाचे सहआयुक्त विनोद जाधव यांच्यासह सर्व नगरपरिषद व नगरपंचायतींचे मुख्याधिकारी उपस्थित होते.
विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करा -
नगरपंचायतींमध्ये सुरू असलेल्या विकासकामांना मुख्याधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज आणि विद्युत व्यवस्थेची कामे नियोजनानुसार व गुणवत्तापूर्ण पद्धतीने सुरू आहेत की नाही, याची खातरजमा करावी. कामांमध्ये त्रुटी आढळल्यास त्या तातडीने दूर कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. वाडी, हिंगणा, नरखेड व उमरेड नगरपरिषदांनी विकास आराखड्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करावा. बुटीबोरी व गोधनी नगरपरिषदांनी निवडणूक प्रभाग नकाशानुसार साक्षांकन करून प्रस्ताव सादर करावेत. रामटेक व मोवाड नगरपरिषदांनी जिल्हा नियोजन व विकास निधीअंतर्गत विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले. बेसा-पिपळा, बहादुरा, बिडगाव व तरोडी नगरपंचायतींचे विकास आराखडे नगर रचना विभागामार्फत तातडीने कार्यवाही करून पूर्ण करावेत. येरखेडा नगरपंचायतीने विकास आराखड्यासंदर्भात १५ दिवसांत विद्यमान जमीन वापर नकाशा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले. निलडोह, डिगडोह व कांद्री (कन्हान) नगरपंचायतींच्या विकास आराखड्यांना लवकरच प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्राधान्य द्या -
पाणीटंचाई निवारणासाठी मंजूर झालेल्या कामांच्या निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्ष कामांना सुरुवात करावी. पेयजल टंचाई निवारणासाठी उपलब्ध निधीचा प्रभावी वापर करावा. विधानसभा मतदारसंघनिहाय लोकप्रतिनिधींशी चर्चा करून आवश्यक विकासकामांचे प्रस्ताव सादर करावेत. तसेच नियोजनातून प्राप्त झालेल्या निधीचा योग्य विनियोग करून पाणीटंचाई निवारणाची कामे वेळेत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.




Petrol Price




