नागपूर : निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा भाग कोसळला, सुदैवाने कुठलीही जीवितहानी टळली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर :
येथील कळमना-पारडी एच बी टाऊन मार्गावरील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग काल रात्रो ९. ३० वाजताच्या सुमारास खाली कोसळला. सुदैवाने दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचे काम बंद होते. त्याचवेळी रस्त्यावर जास्त वाहतूक नव्हती. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.  मात्र, रस्त्याला मोठा खड्डा पडला आहे. दरम्यान, या दुर्घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन महापौर यांनी दिले आहे. 
नागपूरच्या पारडी परिसरातील एच बी टाऊन चौका वरून कळमना कृषी उत्पन्न बाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्याच उड्डाणपुलाच्या दोन पिल्लर दरम्यान सुमारे ५० ते ६० फूट लांबीचा एक सेगमेंटमधून तुटल्यामुळे खाली कोसळला. जेव्हा ही दुर्घटना घडली. सुदैवाने दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाही. 
घटनास्थळाच्या एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती असल्यामुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या संख्येने भाज्यांचे आणि फळांचे ट्रक्स या भागातून जातात. मात्र साडेनऊ वाजता ट्रकची वाहतूक तिथून सुरू झाली नव्हती. त्यामुळे ही जीवित हानी टळली. विशेष म्हणजे उड्डाणपुलाचा सेगमेंट या ठिकाणी रस्त्यावर खाली कोसळला आहे, त्या ठिकाणी त्याच्या इम्पॅक्टमुळे काँक्रीट रोड वरही मोठा खड्डा पडला आहे.
दुर्घटनेनंतर नागपूरचे महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह नागपूर महानगरपालिकेचे अनेक पदाधिकारी पोहोचले. दुर्घटनेची तांत्रिक दृष्टिकोनातून तज्ञांकडून चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्या विरोधात कारवाई करू अशी माहिती महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला असून अग्निशमन दलाचे जवानही तैनात करण्यात आले आहेत.   Print


News - Nagpur | Posted : 2021-10-20
Related Photos