चांदा फोर्ट रेल्वे स्थानक सुरक्षेच्या प्रतीक्षेत : आरपीएफ चौकीसाठी अजय दुबे आक्रमक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावरील अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, येथे स्वतंत्र रेल्वे सुरक्षा बलाची (आरपीएफ) चौकी स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यासंदर्भात झेडआरयूसीसी सदस्य अजय दुबे यांनी शुक्रवार १३ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
चांदा फोर्ट रेल्वे स्थानकावर दररोज १० प्रवासी गाड्या आणि २५ मालगाड्यांची वर्दळ असते. सुमारे ७०० प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. एवढी मोठी रेल्वे वाहतूक आणि प्रवाशांची संख्या असतानाही येथे आरपीएफची स्वतंत्र चौकी नाही. या स्थानकाची सुरक्षा सुमारे १०० किलोमीटर दूर असलेल्या नागभीड येथील आरपीएफ चौकीच्या अखत्यारीत येते.
विशेष म्हणजे, नागभीड चौकीतील केवळ १६ जवानांवर तब्बल २९० किलोमीटर रेल्वे क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. चांदा फोर्ट स्थानकावर प्रत्यक्षात केवळ दोन आरपीएफ जवानांच्या माध्यमातून प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेची सुरक्षा केली जात आहे. त्यामुळे संभाव्य चोरी, गुन्हेगारी आणि अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी स्वतंत्र चौकीची आवश्यकता असल्याचे दुबे यांनी निवेदनात स्पष्ट केले.
या मागणीची दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक भूमिका दर्शविली असून, आगामी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बैठकीत हा विषय उपस्थित करून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे. चांदा फोर्ट येथे आरपीएफ चौकी स्थापन झाल्यास रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित वातावरण मिळण्यासोबतच रेल्वे मालमत्तेच्या संरक्षणालाही बळ मिळणार आहे.




Petrol Price




