महत्वाच्या बातम्या

 अत्याचार प्रकरणी आरोपीला २० वर्षांची सक्तमजुरी : ६ हजारांचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : अवघ्या सहा वर्षे अकरा महिन्यांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २६ वर्षीय आरोपीला चंद्रपूर येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने २० वर्षे सक्तमजुरी आणि सहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ३ नोव्हेंबर २०२६ रोजी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. एम. गुप्ता यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. महेश गजानन मोहुर्ले २६ वर्ष असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ही संतापजनक घटना १६ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळच्या सुमारास गोंडपिपरी तालुक्यात घडली होती. अवघ्या सहा वर्षे अकरा महिन्यांची बालिका घराबाहेर खेळत असताना आरोपी महेश मोहुर्ले याने तिचा हात पकडून जबरदस्तीने स्वतःच्या घरात ओढून नेले. त्यानंतर घराचा दरवाजा आतून बंद करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

दरम्यान, बालिकेच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारी धावून आले. त्यांनी दरवाजा उघडून चिमुरडीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली. या घटनेनंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी धाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपीविरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम ३७६ (ए), (बी), ३६६, ३५४ (ड), ३२३, ५०६ तसेच पोक्सो कायदा आणि अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा सखोल तपास तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांनी केला. तपासाअंती त्यांनी विशेष सत्र खटला क्रमांक ३७/२०२२ अंतर्गत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाने सादर केलेले पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षी ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरविले.

न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ (ए), (बी) आणि पोक्सो कायद्याच्या कलम ६ अंतर्गत २० वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंड, तर कलम ३६६ अंतर्गत तीन वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम न भरल्यास अनुक्रमे एक महिना आणि १५ दिवसांचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या प्रकरणात सरकारी अभियोक्ता म्हणून ॲड सुधाकर देगावार यांनी काम पाहिले. न्यायालयीन कामकाजासाठी पोलीस ठाणे धाबा येथील कोर्ट पैरवी अधिकारी सफौ सुधाकर आत्माराम कोहपरे यांनी सहकार्य केले. तसेच धाबा पोलीस ठाण्याचे ठाणेदार सपोनि विरेंद्र केदारे यांचेही सहकार्य लाभले. दोषसिद्धी कक्ष, चंद्रपूर यांनी या प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, राजुरा यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी करण्यात आली.





  Print






Related Photos