टेकाडी गुरुद्वाराजवळ भीषण अपघात : दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी


- नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर ट्रकची दुचाकीला जोरदार धडक; अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह पसार
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावरील टेकाडी गुरुद्वाराजवळ शनिवारी ३१ पहाटेच्या सुमारास ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले. सौरभ पंजाबराव वासे (रा. रामनगर, कन्हान) असे मृत तरुणाचे नाव असून, अमन राजू जोसेफ आणि आशिष कन्हैयालाल ठाकूर अशी जखमींची नावे आहेत. अपघातानंतर संबंधित ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरभ वासे, अमन जोसेफ आणि आशिष ठाकूर हे तिघे तरुण शनिवारी पहाटे सुमारे अडीच वाजताच्या सुमारास एमएच ४० के ९७९० क्रमांकाच्या दुचाकीने टेकाडीच्या दिशेने जात होते. दरम्यान, मनसरकडून येणारा एक अज्ञात ट्रक भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे रस्ता ओलांडून कामठी खुल्या खदानीच्या दिशेने जात होता. याचवेळी दुचाकीची ट्रकला जोरदार धडक बसली.
धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात तिघांनाही गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर घटनास्थळी काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, अमन जोसेफ याने प्रसंगावधान राखत तातडीने पोलिसांना अपघाताची माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तिन्ही तरुणांना तातडीने नागपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती सौरभ पंजाबराव वासे याला मृत घोषित केले. तर अमन जोसेफ आणि आशिष ठाकूर या दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, अपघात घडवून आणल्यानंतर ट्रकचालक वाहनासह घटनास्थळावरून पसार झाला. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या ट्रकचा आणि चालकाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. या अपघातामुळे कन्हान परिसरातील रामनगर येथे शोककळा पसरली असून, एका तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत असून, अपघाताची नेमकी कारणे आणि पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.




Petrol Price




