महत्वाच्या बातम्या

 तृतीयपंथी समुदायासाठी विशेष आभा नोंदणी अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींना आरोग्य सेवेच्या मुख्य प्रवाहात आणण्यासोबतच त्यांना आवश्यक वैद्यकीय सेवा, आरोग्यविषयक मार्गदर्शन आणि शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा यांच्या वतीने कोंठा कोसरा येथे विशेष आभा (ABHA) नोंदणी अभियान राबविण्यात आले.

या अभियानांतर्गत तृतीयपंथी व्यक्तींची आरोग्य तपासणी करण्यात आली. आवश्यकतेनुसार वैद्यकीय उपचार, आरोग्यविषयक मार्गदर्शन व समुपदेशन करण्यात आले. तसेच शासनाच्या विविध आरोग्य सुविधा व योजनांची माहिती देण्यात आली. आभा नोंदणीमुळे नागरिकांना त्यांच्या आरोग्यविषयक  डिजिटल नोंदणी उपलब्ध होणार आहे.

समाजातील प्रत्येक घटकाला  गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा मिळणे आवश्यक आहे. या उद्देशाने राबविण्यात आलेल्या अभियानातून तृतीयपंथी समुदायाच्या आरोग्यविषयक गरजांकडे विशेष लक्ष देण्यात आले.

तृतीयपंथी समुदायातील व्यक्तींनी कोणतीही भीती, संकोच किंवा भेदभावाची भावना न ठेवता शासकीय रुग्णालयातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा,  कोणतीही समस्या उद्भवल्यास विलंब न करता रुग्णालयाशी संपर्क साधावा असे यावेळी सांगण्यात आले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुजाता दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान पार पडले. वरिष्ठ समाजसेवा अधीक्षक अरविंद शंभरकर आणि हेमंत साखरे यांनी अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी सक्रिय योगदान दिले.





  Print






Related Photos