पडोली पोलिसांचा पाठलाग करून गोवंश तस्करीचा ट्रक पकडला : २८ जनावरांची सुटका


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : गोवंशीय जनावरांची अवैध व अमानुष वाहतूक करणाऱ्या सहा चाकी आयशर ट्रकवर पडोली पोलिसांनी कारवाई केली. पडोली चौकातील नाकाबंदी दरम्यान पोलिसांना पाहून भरधाव वेगाने पळ काढणाऱ्या ट्रकचा पोलिसांनी पाठलाग करून वरोडा गावाजवळ अडविले. या कारवाईत ट्रकमध्ये अमानुषपणे कोंबून ठेवलेल्या २८ गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, ट्रक व मोबाईलसह एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांचे पथक पडोली चौकासमोर नाकाबंदी करीत असताना, चंद्रपूरच्या दिशेने इरई नदी मार्गाने एक लाल रंगाचा सहा चाकी आयशर ट्रक येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या ट्रकवर निळ्या रंगाची ताडपत्री झाकलेली होती. ट्रक क्रमांक एमएच २८ बी बी ४९७० असल्याचे समोर आले.
पोलिसांनी ट्रकचालकाला हात दाखवून वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र, चालकाने ट्रक रस्त्याच्या बाजूला वळवून पेट्रोल पंपाच्या आवारातून यू-टर्न घेतला आणि विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने वाहन चालवत पळ काढला. यामुळे पोलिसांनी तातडीने ट्रकचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी चालकाने कोसारा फाटा चौकातून देवाडा मार्गे वेंडली आणि पुढे राजुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वरोडा गावाच्या दिशेने पलायन केले. मात्र, पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवला. अखेर वरोडा गावातील रस्त्यावर अडथळा निर्माण करून ट्रक थांबविण्यात आला. यावेळी चालकाने वाहन जागेवर सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काळ त्याचा पाठलाग करून गावालगतच्या शेतशिवारात त्याला ताब्यात घेतले.
ट्रकची तपासणी केली असता, त्यामध्ये २८ गोवंशीय जनावरे अत्यंत दाटीवाटीने आणि अमानुषपणे कोंबून ठेवल्याचे आढळून आले. पोलिसांनी सर्व जनावरांची सुटका करून ट्रकसह चालकाला पडोली पोलीस ठाण्यात आणले.
या प्रकरणी अब्दुल हफिज गुफ्रान खान (वय ३३), रा. प्रभाग क्रमांक ४, कुरेशी मोहल्ला, गडचांदूर याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याविरुद्ध पडोली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३१६/२०२६ नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५) मधील कलम ५(१), ५(ब), ९, प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंधक अधिनियम १९६० मधील कलम ११(१)(ड), तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १३२, १७९ आणि १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईत १ लाख ८३ हजार रुपये किमतीची २८ जिवंत गोवंशीय जनावरे, २० लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा सहा चाकी आयशर ट्रक आणि १० हजार रुपये किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण २१ लाख ९३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुधाकर कोकोडे, पोलीस हवालदार विनोद वानकर, पोलीस अंमलदार धिरजकुमार लोधी, समीर खाडे, श्रीनिवास वाभीटकर आणि धिरज भोयर यांनी केली.




Petrol Price




