महत्वाच्या बातम्या

 शेतकरी व मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधले


- तळोधी–कुनघाडा परिसरातील सिंचन, Farmer ID, ७/१२–८-अ व कृषी योजनांसह आधुनिक मच्छी मार्केटची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : तळोधी–कुनघाडा परिसरातील शेतकरी व मच्छीमारांच्या विविध मूलभूत समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली यांच्या वतीने करण्यात आली. यासंदर्भात कृषी, सिंचन, महसूल, भूमिअभिलेख तसेच मत्स्यव्यवसाय विभागाकडे विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

तळोधी उपसा सिंचन योजनेतील नादुरुस्त वाल्व्ह, पाइपलाइनमधील तुटलेले जॉइंट, गळती आणि पाण्याच्या असमतोल वितरणामुळे अनेक शेतकऱ्यांना पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत. विशेषतः उंचावरील व टेल-एंड शेतांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने कृषी उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे कृषी व सिंचन विभागाने संयुक्त स्थळ पाहणी करून तांत्रिक बिघाड तातडीने दूर करावा आणि संपूर्ण लाभक्षेत्रासाठी न्याय्य पाणी वितरणाचे वेळापत्रक निश्चित करावे, अशी मागणी करण्यात आली.

चामोर्शी तालुका दुष्काळग्रस्त घोषित झाल्याच्या पार्श्वभूमीवर पात्र शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान व उत्पादनातील घट यांचे गावनिहाय आणि शेतनिहाय पंचनामे तातडीने करावेत, तसेच कोणताही पात्र शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये यासाठी विशेष पथके नियुक्त करावीत, अशी मागणीही करण्यात आली.

दरम्यान, Farmer ID तयार करणे, लिंक करणे व दुरुस्ती, ७/१२–८-अ ऑनलाइन उतारे, पीकविमा, कृषी योजना व अनुदान यासंदर्भातील अडचणी सोडविण्यासाठी कृषी, महसूल व भूमिअभिलेख विभागांचे संयुक्त विशेष शेतकरी सुविधा शिबिर तळोधी–कुनघाडा परिसरात आयोजित करावे, अशी मागणी करण्यात आली.

याचबरोबर तळोधी मोकासा येथे भव्य, आधुनिक, स्वच्छ व सर्व सुविधायुक्त मच्छी मार्केट उभारण्याची मागणी मत्स्यव्यवसाय विभागाकडे करण्यात आली. परिसरातील अनेक मच्छीमार, मच्छी विक्रेते, महिला व युवक मत्स्य व्यवसायावर अवलंबून असून, स्वतंत्र व नियोजनबद्ध बाजारपेठ नसल्यामुळे त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रस्तावित मच्छी मार्केटसाठी योग्य जागेची पाहणी करून जागा निश्चित करणे, व्यवहार्यता अहवाल व प्राथमिक आराखडा तयार करणे, अंदाजपत्रक तयार करून उपलब्ध शासकीय योजनांमधून निधी मिळविणे तसेच आवश्यक प्रशासकीय व तांत्रिक मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मच्छी मार्केटमध्ये कायमस्वरूपी विक्री स्टॉल, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, मच्छी स्वच्छ करण्यासाठी स्वतंत्र जागा, सांडपाणी व मत्स्य कचरा व्यवस्थापन, बर्फ साठवणूक व कोल्ड स्टोरेज, वीज व प्रकाश व्यवस्था, पार्किंग, महिलांसाठी सुरक्षित विक्री जागा तसेच मत्स्य प्रक्रिया, पॅकिंग व मूल्यवर्धनाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.

या दोन्ही क्षेत्रांतील मागण्यांमुळे शेतकऱ्यांना सिंचन व कृषी योजनांचा प्रत्यक्ष लाभ, तर मच्छीमारांना योग्य बाजारपेठ व उत्पन्नवाढीची संधी मिळू शकते. तसेच महिला व युवकांसाठी रोजगार व स्वयंरोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास संस्थेने व्यक्त केला.

शेतकरी व नागरिकांच्या प्रत्येक तक्रारीला प्राप्ती क्रमांक देऊन कागदपत्र तपासणी, स्थळ पाहणी, पंचनामा किंवा तांत्रिक अहवाल आणि अंतिम कार्यवाही अशी वेळबद्ध तक्रार निवारण व्यवस्था सुरू करण्याची मागणीही करण्यात आली.

यावेळी गणेश मुनरत्तीवर, ज्ञानेश्वर भोयर (मत्स्य सोसायटी अध्यक्ष), योगराज गेडाम, धनुभाऊ भोयर (वाल्मिकी समाज अध्यक्ष), सूरज प्रकाश बोबाटे, अमोल खोबरे, विकास राजू बोदलकर (सचिव, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था) तसेच अभिलाष दशरथ कुनघाडकर (अध्यक्ष, राजमाता जिजाऊ बहुउद्देशीय संस्था, गडचिरोली) उपस्थित होते.

शेतकरी व मच्छीमारांच्या समस्या केवळ निवेदनापुरत्या मर्यादित न राहता प्रत्यक्ष स्थळ पाहणी, विभागीय समन्वय आणि वेळबद्ध कार्यवाहीद्वारे सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.





  Print






Related Photos