मेंढा व शहापुर येथे भटक्या-विमुक्तांसाठी विशेष शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / भंडारा : भटक्या व विमुक्त प्रवर्गातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाच्या वतीने तहसील कार्यालय, भंडारा अंतर्गत तीन दिवसीय विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी मौजा मेंढा येथील कहार समाज हॉल तसेच शहापूर येथील ग्रामपंचायत परिसरात विशेष शिबिर घेण्यात आले.
मेंढा येथील शिबिराला कहार, बैरागी, लोहार व गोपाळ समाजातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच शहापूर येथे ठाण, मुजबी व जवाहरनगर परिसरातील भटकंती करणाऱ्या अहीर व गोपाळ समाजातील नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.
शिबिरामध्ये आधारकार्ड, मतदान कार्ड, आयुष्मान कार्ड, नवीन व अद्ययावत शिधापत्रिका, रहिवासी दाखले, अधिवास दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र तसेच विशेष सहाय्य योजनेंतर्गत श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना व विविध महामंडळांच्या योजनांची माहिती व सेवा उपलब्ध करून देण्यात आली. यासोबतच नागरिकांची आरोग्य तपासणीही करण्यात आली.
मौजा मेंढा येथे २०० हून अधिक तर शहापूर ग्रामपंचायत परिसरात ३०० हून अधिक लाभार्थ्यांनी शिबिराचा लाभ घेतला. यापैकी आधारकार्ड २०, जात प्रमाणपत्र १९, शिधापत्रिका १५, उत्पन्न प्रमाणपत्र २३, आरोग्य विभागाच्या १०५, लाडकी बहीण योजनेचे ३३ तसेच कृषी विभागाच्या १२७ लाभार्थ्यांची प्रमाणपत्रे व योजनांशी संबंधित प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करण्यात आली. ऑनलाइन तयार करण्यात आलेली प्रमाणपत्रे लवकरच मान्यवरांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहेत.
शिबिरास भंडारा तहसीलदार संदीप माकोडे यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी नायब तहसीलदार घनश्याम सोनकुसरे, मंडळ अधिकारी मंडारी, स्थानिक ग्राम महसूल अधिकारी तसेच तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग, संजय गांधी विभाग, आरोग्य विभाग, कृषी विभाग व सेतू विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.




Petrol Price




