महत्वाच्या बातम्या

 नशामुक्त समाज घडविण्यासाठी युवकांनी पुढे यावे : एसडीपीओ डॉ.वंदना कारखेले


- भिडी येथे गणेशोत्सवात लोकसंवाद कार्यक्रम

- माहिती व जनसंपर्क विभागाचा उपक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अमली पदार्थांचे सेवन हे व्यक्तीच्या आरोग्यासोबतच कुटुंब आणि समाजाच्या भवितव्यावरही गंभीर परिणाम करणारे आहे. युवक हे देशाची मोठी शक्ती असून त्यांनी व्यसनांपासून दूर राहून नशामुक्त समाजाच्या निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा. युवकांनी स्वत: व्यसनमुक्त राहण्यासोबतच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही नशाविरोधी जनजागृती करावी, असे आवाहन पुलगावच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.वंदना कारखेले यांनी केले.

नवयुवक गणेशोत्सव मंडळ, भिडी येथे माहिती व जनसंपर्क विभाग आणि पोलीस विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी देवळीचे ठाणेदार संदीप कापडे, एनसीसीचे मोहन गुजरकर, सेंटर समन्वयक जोसना वरघट, तालुका समन्वयक लक्ष्मी काकडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे दिलीप बोंडसे यांच्यासह नवयुवक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

युवावस्थेत व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढू नये, यासाठी कुटुंब, शाळा-महाविद्यालये, सामाजिक संस्था तसेच युवक मंडळांनी एकत्रितपणे प्रयत्न करण्याची गरज आहे. अमली पदार्थांपासून दूर राहणे ही केवळ वैयक्तिक जबाबदारी नसून समाजाच्या सुरक्षित आणि निरोगी भविष्यासाठी आवश्यक बाब आहे. युवकांनी आपल्या परिसरातील व्यसनाधीन व्यक्तींना योग्य मार्गदर्शन करून त्यांना व्यसनमुक्तीच्या दिशेने आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे एसडीपीओ डॉ. वंदना कारखेले यांनी सांगितले. तसेच अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम स्पष्ट केले.

लोकसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून नशामुक्ती, अमली पदार्थांचे दुष्परिणाम तसेच डिजिटल व आर्थिक व्यवहारातील सुरक्षितता याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. एनसीसीच्या विद्यार्थांनी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत या संकल्पनेवर आधारित नुक्कड नाटिका सादर केली. या नाटिकेच्या माध्यमातून अमली पदार्थांच्या सेवनाचे दुष्परिणाम, व्यसनामुळे होणारे कौटुंबिक व सामाजिक नुकसान तसेच व्यसनापासून दूर राहण्याचा संदेश प्रभावीपणे देण्यात आला.

म्यूल अकाऊंट व बॅंकिंग लोकपालबाबत माहिती -
कार्यक्रमात सेंटर समन्वयक जोसना वरघट यांनी मनी म्यूल तसेच बँकिंग लोकपाल याबाबत माहिती दिली. ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना नागरिकांनी घ्यावयाची खबरदारी, अनोळखी व्यक्तींना बँक खात्याची माहिती, ओटीपी, पासवर्ड किंवा इतर गोपनीय माहिती न देणे तसेच आर्थिक फसवणूक झाल्यास तक्रार निवारणासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांची माहिती त्यांनी दिली.





  Print






Related Photos