विसापूर मार्गावर बाबुळाच्या झाडाला फाशी : अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने खळबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : वस्ती विभागातून विसापूरकडे जाणाऱ्या मार्गावरील नाल्याजवळ बाबुळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने फाशी घेतलेल्या अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित इसमाने वस्ती विभागातून विसापूरकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या नाल्याजवळील बाबुळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने फाशी घेतल्याचे आढळून आले. मृत इसमाच्या अंगावर गोल गळ्याचा टी-शर्ट व अंडरवेअर होते.
मृतदेह काही काळ तेथेच असल्याने त्यातून दुर्गंधी येऊ लागली. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या लक्षात ही घटना आली.
घटनेची माहिती मिळताच बल्लारपूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला आणि पुढील शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून, त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचे तसेच ओळख पटविण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.
या प्रकरणी पोलिसांनी नोंद करून घटनेमागील परिस्थितीचा तपास सुरू केला आहे. अज्ञात इसमाने आत्महत्या का केली, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार नंदकिशोर माहूरकर, संजय कोंडेकार करीत आहेत.




Petrol Price




