महत्वाच्या बातम्या

 फॉरेक्स ट्रेडिंगच्या आमिषाने २०.४१ लाखांची फसवणूक


- ४४ लाखांची गुंतवणूक; २३.५८ लाख परत, उर्वरित रक्कम न दिल्याचा आरोप

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केल्यानंतर २० लाख ४१ हजार १२० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी भंडारा पोलिसांनी तुमसर येथील कुंजनलाल भोंडेकर ३४ वर्षे रा. माता वॉर्ड, तुमसर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कुंजनलाल भोंडेकर याने प्रमोद बळीराम साकुरे ४५ वर्षे  रा. गणेशपूर आणि त्यांच्या नातेवाईकांचा विश्वास संपादन केला. आपण फॉरेक्स ट्रेडिंगमध्ये काम करीत असून अनेक व्यक्तींची कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली असल्याचे त्याने सांगितले. फॉरेक्स ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला परतावा मिळत असल्याचे सांगून त्याने साकुरे आणि त्यांच्या नातेवाईकांना त्याच्याकडे पैसे गुंतविण्यास प्रवृत्त केले.

भोंडेकरच्या सांगण्यावर विश्वास ठेवून साकुरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी त्याच्याकडे एकूण ४४ लाख रुपये गुंतवणुकीसाठी दिले. त्यापैकी २३ लाख ५८ हजार ८८० रुपये परत करण्यात आले. मात्र, उर्वरित २० लाख ४१ हजार १२० रुपये परत न करता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

उर्वरित रक्कम परत मिळत नसल्याने साकुरे यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भोंडेकरविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून, या प्रकरणाचा तपास सहाय्यक फौजदार मोहरकर करीत आहेत. दरम्यान, मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या व्यक्तींची आणि संबंधित गुंतवणूक योजनेची पूर्ण पडताळणी केल्यानंतरच पैसे गुंतवावेत, असे आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे.





  Print






Related Photos