महत्वाच्या बातम्या

 शेती अभ्यास दौऱ्यासाठी पात्र शेतकऱ्यांची २५ ऑगस्टला सोडत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती मिळावी आणि विदेशी शेती पद्धतींचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, यासाठी कृषी विभागाकडून देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रगत कृषी तंत्रज्ञान, आधुनिक पीक व्यवस्थापन पद्धती तसेच जागतिक स्तरावरील शेतीतील नव्या प्रयोगांची माहिती मिळणार आहे.

या अभ्यास दौऱ्यासाठी जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते.या अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पात्र शेतकऱ्यांची अंतिम निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे. पारदर्शक पद्धतीने ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असून, पात्र अर्जदारांना यात सहभागी होता येणार आहे.अभ्यास दौऱ्यासाठी होणारी सोडत प्रक्रिया मंगळवार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडणार आहे. संबंधित शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रीती हिरळकर यांनी माहिती देत शेतकऱ्यांना या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे. विदेशी शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून त्याचा उपयोग जिल्ह्यातील शेती विकासासाठी होण्यास मदत होणार आहे.या अभ्यास दौऱ्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागतिक कृषी क्षेत्रातील नवीन संकल्पना समजून घेण्याची आणि त्या आपल्या शेतीत राबविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.





  Print






Related Photos