पूल खचण्याचे सत्र : तीन वर्षांतच कांदोळी पुलाचा स्लॅब दबला


- निकृष्ट बांधकामाचा आणखी एक नमुना , वेळीच दुरुस्ती न झाल्यास मोठ्या दुर्घटनेची शक्यता
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / एटापल्ली/अहेरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कोठी-कोरनार येथील पूल खचल्याची घटना ताजी असतानाच, गडचिरोली जिल्ह्यात निकृष्ट बांधकामाचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. एटापल्ली तालुक्यातील कांदोळी गावाजवळ बांडिया नदीवर अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पुलाचा मधोमध स्लॅब दबला असून, पुलाच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
एटापल्ली आणि भामरागड या दोन महत्त्वाच्या तालुक्यांना जोडणाऱ्या प्रमुख मार्गावरील हा पूल नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या पुलामुळे परिसरातील नागरिकांचा तब्बल ५० किलोमीटरचा प्रवास कमी झाला होता. नागरिकांच्या मागणीनंतर कोट्यवधी रुपये खर्च करून बांडिया नदीवर या पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र, बांधकाम पूर्ण होऊन अवघी तीन वर्षे उलटत नाहीत तोच पुलाच्या स्लॅबला तडे जाणे व तो खाली दबणे यामुळे बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
अवजड वाहतुकीमुळे धोका वाढण्याची शक्यता -
पुलाचा मधोमध असलेला स्लॅब खाली दबल्याने भविष्यात हा भाग आणखी खचण्याची शक्यता आहे. सध्या या पुलावरून अवजड वाहतूक सुरू राहिल्यास पुलाला अधिक धोका निर्माण होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक ती दुरुस्ती व सुरक्षात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
मोठा कंत्राटदार, पेटी ठेकेदाराचा खेळ -
मिळालेल्या माहितीनुसार, या पुलाचे मुख्य कंत्राट नागपूर येथील एका मोठ्या कंत्राटदाराकडे होते. मात्र, पुलाचे प्रत्यक्ष बांधकाम जिल्ह्यातील एका स्थानिक पेटी ठेकेदारामार्फत करण्यात आल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, संबंधित स्थानिक पेटी ठेकेदाराचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे पुलाच्या निकृष्ट कामाची जबाबदारी नेमकी कोणावर निश्चित करायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या या पुलाची अवघ्या तीन वर्षांत झालेली दुरवस्था ही गंभीर बाब आहे. संबंधित विभागाने पुलाची तांत्रिक तपासणी करून बांधकामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी आणि दोषींवर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
कोट्यवधी रुपये खर्च करून अवघ्या तीन वर्षांपूर्वी बांडिया नदीवर हा पूल बांधण्यात आला. आता पुलाचा स्लॅब खाली दबला असून तो पुढे पूर्णपणे कोसळण्याची शक्यता आहे. अवजड वाहतूक सुरू राहिल्यास मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ पुलाची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.
डोलेश मडावी, नागरिक, कांदोळी
News - Gadchiroli




Petrol Price




