वनसंरक्षण समितीच्या हॉलमधील चोरीचा छडा : तिघांना अटक

- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; १ लाख ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर : सातारा तुकूम येथील वनसंरक्षण समितीच्या हॉलमध्ये झालेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छडा लावला असून, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून १ लाख ३२ हजार ८०० रुपये किमतीचा विविध साहित्याचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
उमरी पोतदार उपपोलिस स्टेशनच्या हद्दीतील सातारा तुकूम येथील वनसंरक्षण समितीच्या हॉलमध्ये अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून रोकड व विविध साहित्य चोरून नेले होते. याप्रकरणी उमरी पोतदार उपपोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (ई), ३३१ (३) व ३३१ (४) अन्वये तक्रार दाखल करण्यात आली होती.
चोरीच्या या घटनेचा तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरू केला. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख नाजीम शेख हाफीज ३९ वर्षे नसीब स्क्रॅप मर्चंट, रा. चंद्रपूर, मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब ऊर्फ सक्सेना ४४ वर्षे रा. घुटकळा वॉर्ड, चंद्रपूर आणि पैयनप्पा ऊर्फ कुट्टी अण्णा रवी शेट्टी रा. सावरकर चौक, चंद्रपूर यांना अटक केली.
आरोपींकडून पोलिसांनी हुस्कवार्ना कंपनीची फायर फायटिंग एअर मशीन, लोखंडी कुंपणाच्या तारेचे बंडल, ३५ स्टीलची ताटे, मिरची कांडप मशीनचे सुटे भाग, अॅल्युमिनियम इलेक्ट्रिक तारेचे २० बंडल, इलेक्ट्रिक पोलचे तुकडे तसेच रेल्वे रुळ कापणीशी संबंधित ३७८ किलो लोखंडी साहित्य हस्तगत केले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत १ लाख ३२ हजार ८०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अटकेतील तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी उमरी पोतदार पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या चोरीत आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच आरोपींचा अन्य चोरीच्या घटनांशी संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक आयुष नोपाणी व अप्पर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत एपीआय बलराम झाडोकार, पीएसआय संतोष निंभोरकर, पीएसआय विनोद भुरले, किशोर वैरागडे, चेतन गज्जलवार, प्रफुल गारघाटे, सुमित बरडे आणि मिलिंद टेकाम यांनी सहभाग घेतला.
News - Chandrapur




Petrol Price




