महत्वाच्या बातम्या

 पाचपावलीत ४० वर्षीय व्यक्तीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला


- आकस्मिक मृत्यूची नोंद; मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पोलिसांचा तपास सुरू

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेल्वे क्वार्टर्सजवळील झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय व्यक्तीचा राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

मृताचे नाव रोशन श्रीपाद डोंगरे ४० वर्षे असे असून, तो रेल्वे क्वार्टर्सजवळील झोपडीत एकटाच राहत होता. प्राथमिक माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी त्याच्या आईचे निधन झाले होते. त्यानंतर तो एकटाच राहत असल्याचे तसेच मानसिकदृष्ट्या खचल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

रोशन बेरोजगार होता. त्याला जवळचे आधार देणारे नातेवाईक नसल्याचेही समोर आले आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गेल्या काही दिवसांत त्याला मद्याचे व्यसन लागले होते. मात्र, या बाबींचा त्याच्या मृत्यूशी संबंध आहे का, याबाबत पोलिसांनी कोणताही अधिकृत निष्कर्ष व्यक्त केलेला नाही.

सोमवारी त्याचा नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. शेजाऱ्यांना हा प्रकार लक्षात येताच त्यांनी तातडीने पाचपावली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि रोशन याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मेयो येथे नेले. तेथे डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

शेजाऱ्याच्या तक्रारीवरून पाचपावली पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, शवविच्छेदन अहवाल आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos