धानोरीच्या तलावात अंघोळीस गेलेला युवक बुडाला : एनडीआरएफकडून रात्रभर शोधमोहीम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / कुरखेडा : तालुक्यातील खेडेगाव येथे सती नदीत अंघोळीसाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी आणखी एका बुडीत दुर्घटनेने परिसर हादरला.
तालुक्यातील धानोरी गावातील तलावात अंघोळीसाठी गेलेला २२ वर्षीय युवक पाण्यात बुडाल्याची घटना रविवार २ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ४.४५ वाजताच्या सुमारास घडली. अंधार पडल्यामुळे शोधकार्यात अडथळे निर्माण झाल्याने गडचिरोली येथून एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
पंकज दिलीप वाडगुरे २२ वर्षे रा. धानोरी असे पाण्यात बुडालेल्या अविवाहित युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंकज हा दिवसभर शेतातील धान रोवणीचे काम आटोपल्यानंतर गावाच्या मध्यभागी असलेल्या तलावात अंघोळीसाठी गेला होता. तलावात उतरण्यापूर्वी त्याने एका मुलाकडे आपले कपडे देत, मी लवकर अंघोळ करून येतो, असे सांगितले. त्यानंतर तो तलावाच्या खोल पाण्यात गेला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला.
घटनेची माहिती मिळताच पुराडा पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ आणि नायब तहसीलदार वैभव आंबेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने युवकाचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, अंधार पडल्याने शोधमोहीम राबविणे शक्य झाले नाही.
यानंतर गडचिरोली येथून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या एनडीआरएफ पथकाला पाचारण करण्यात आले. रात्री सुमारे ८.३० वाजता एनडीआरएफचे पथक धानोरी येथे दाखल झाले. पथक घटनास्थळी पोहोचताच तलावात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली, अशी माहिती पोलिस निरीक्षक महेंद्र वाघ यांनी दिली.
धानोरी हे गाव कुरखेडा मुख्यालयापासून सुमारे सात किलोमीटर अंतरावर आहे. खेडेगाव येथील तीन शाळकरी मुलांच्या बुडून मृत्यूच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या एका दिवसात घडलेल्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून पावसाळ्यात नदी, तलाव व इतर जलाशयांमध्ये उतरताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
News - Gadchiroli




Petrol Price




