महत्वाच्या बातम्या

 पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्या पुढाकाराने जिल्ह्यातील १४ स्थळांना तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा


- वर्ध्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारणार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक व पर्यटन विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत ग्रामीण भागातील १४ देवस्थाने, यात्रास्थळे व तीर्थक्षेत्रांना क वर्ग दर्जा मंजूर करण्यात आला.

त्याचबरोबर वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार असल्याची घोषणा पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीला पालकमंत्र्यांसह खासदार अमर काळे, आमदार अभिजित वंजारी, आमदार सुधाकर अडबाले, आमदार अरुण लखानी, आमदार समीर कुणावार, आमदार राजेश बकाने, आमदार सुमित वानखेडे, जिल्हाधिकारी वान्मथी सी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

बैठकीच्या प्रारंभी पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन केले. महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक जडणघडणीत अण्णाभाऊ साठे यांचे योगदान मोलाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाचे स्मारक म्हणून जतन करण्याचा निर्णय आणि सुमारे ३०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याचा शुभारंभ केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

क वर्गाचा दर्जा मिळालेल्या तीर्थक्षेत्रांमध्ये समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव (चौ.) येथील सद्गुरु जगन्नाथ बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, वर्धा तालुक्यातील नालवाडी येथील संत नरहरी महाराज देवस्थान ट्रस्ट, देवळी तालुक्यातील इंझाळा येथील महादेव मंदिर देवस्थान सेवा समिती, तळेगाव (टा.) येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान, सावंगी (मेघे) येथील श्री महादेव मंदिर, बोरगाव (मेघे) येथील आई तुळजाभवानी (सुपारी माता) मंदिर, शिरपूर येथील संत पैगाजी महाराज देवस्थान, आलोडी येथील स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार परिसर, सेलू तालुक्यातील दोडकी येथील विठ्ठल-रुख्माई मारुती देवस्थान, आलोडी अंजनामाता चॅरिटेबल ट्रस्ट, महाकाळ येथील संत तुकडोजी महाराज देवस्थान संस्थान, आलोडी येथील पवनसुत हनुमान मंदिर सेवा मंडळ, म्हसाळा येथील श्री संत जगन्नाथ महाराज मंदिर सेवा समिती तसेच देवळी तालुक्यातील नाचणगाव येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानांचा समावेश आहे.

या निर्णयामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांमध्ये मूलभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सोयी-सुविधा आणि धार्मिक पर्यटनाला चालना मिळणार असून ग्रामीण भागाच्या विकासालाही गती मिळणार आहे. तसेच यामुळे जिल्ह्यातील धार्मिक स्थळांचा विकास, पर्यटनवृद्धी आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यास मोठी चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.





  Print






News - Wardha




Related Photos